

Wardha River Youth Drowned
चंद्रपूर : वरोरा शहराजवळील वर्धा नदीच्या तुळणा घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांपैकी एका युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १२ ) सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, क्षितिज विनोद चौधरी (वय २६, रा. चंद्रपूर), अरुण कुमार केवर्त (२७) आणि हिरालाल चंदन (२७, रा. उत्तराखंड) हे तिघेही वरोरा येथील जीएमआर एनर्जी कंपनीत कार्यरत असून कंपनीच्या परिसरात वास्तव्यास होते. सुट्टी असल्याने तिघेही वर्धा नदीत पोहण्यासाठी गेले होते.
पोहत असताना क्षितिज चौधरी खोल पाण्यात गेल्याने तो बुडू लागला. त्याला वाचविण्याचा इतर दोघांनी आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच जीएमआर कंपनीच्या रेस्क्यू पथकासह चंद्रपूर येथील बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र अंधार पडल्याने शोधमोहीम काही काळ स्थगित करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत गोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.