Chandrapur News | ब्रह्मपुरीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची जोरदार मागणी; विजय वडेट्टीवार यांनी वेधले सरकारचे लक्ष

'ब्रह्मपुरी जिल्हा होण्यासाठी सर्व अहवाल अनुकूल'; नागभीड, सिंदेवाहीसह परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र जिल्ह्याची गरज असल्याचे प्रतिपादन
Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार File Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची ठाम मागणी केली. ब्रह्मपुरी हे जिल्हा निर्मितीसाठी सर्व निकषांवर पात्र असून भविष्यात नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव शासनासमोर आल्यास ब्रह्मपुरीचा सकारात्मक विचार करून त्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

विधानसभेत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ब्रह्मपुरीला स्वतंत्र जिल्हा करण्याबाबत यापूर्वी विविध स्तरांवर सकारात्मक प्रस्ताव आणि अहवाल शासनाकडे सादर झाले आहेत. त्यामुळे भविष्यात राज्यात नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा विषय समोर आल्यास ब्रह्मपुरीला प्राधान्याने स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्यावा.

ते म्हणाले की, ब्रह्मपुरीसह नागभीड, सिंदेवाही आणि परिसरातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध व्हाव्यात, प्रशासन लोकांच्या अधिक जवळ यावे तसेच या संपूर्ण भागाच्या विकासाला नवी चालना मिळावी, यासाठी स्वतंत्र जिल्हा ही काळाची गरज आहे.

वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरीच्या विकासात्मक क्षमतेवरही भर देत सांगितले की, ब्रह्मपुरी हे त्यांच्या मतदारसंघातील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय सुविधा तसेच इतर मूलभूत पायाभूत सुविधांच्या दृष्टीने हे शहर सक्षम असून स्वतंत्र जिल्ह्याचे मुख्यालय होण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे.

सरकारला उद्देशून ते म्हणाले की, "ब्रह्मपुरी जिल्हा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल, विभागीय आयुक्तांचा अहवाल तसेच इतर संबंधित विभागांचे अहवालही अनुकूल आहेत. भविष्यात नवीन जिल्ह्यांचा विषय शासनासमोर आल्यास ब्रह्मपुरी जिल्हा होण्यासाठी आवश्यक सर्व बाबींचा सकारात्मक विचार करण्यात यावा." विधानसभेत वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या या मागणीमुळे ब्रह्मपुरीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news