

चंद्रपूर : जगभरात तणावाचे वातावरण असताना चंद्रपूर शहरातून शांततेचा बुलंद संदेश देण्यात आला आहे. चंद्रपूर येथील सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशनच्या विद्यार्थ्यांनी ‘मानवी शांतता चिन्ह’ (Human Peace Symbol) साकारत जागतिक विक्रम प्रस्थापित केला. या अनोख्या उपक्रमाची नोंद थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे चंद्रपुरात एका महिन्यात नोंदवला गेलेला हा दुसरा विश्वविक्रम ठरला आहे.
आज चंद्रपूर शहराजवळील वडगाव येथील सोमय्या कॅम्पसमध्ये हा ऐतिहासिक उपक्रम पार पडला. जगात वाढत चाललेले युद्धजन्य वातावरण, तसेच इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी शांततेचा संदेश देण्यासाठी हा विश्वविक्रमी प्रयत्न केला. ‘जगात शांतता नांदावी’ हा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानावर उभे राहत शांतीचे जागतिक प्रतीक असलेले चिन्ह तयार केले.
यापूर्वी या प्रकारचा विश्वविक्रम एक हजार ७० विद्यार्थ्यांच्या सहभागातून नोंदवण्यात आला होता. मात्र चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी तो विक्रम मोडीत काढत तब्बल एक हजार तीनशे विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘मानवी शांतता चिन्ह’ साकारले आणि नवा इतिहास घडवला. नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना मैदानात उभे करून अचूक रचनेतून हे शांतीचे चिन्ह तयार करण्यात आले. हा देखावा पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण प्रक्रियेचे निरीक्षण करून नियमांनुसार पडताळणी केली. सर्व निकष पूर्ण झाल्यानंतर सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशनचे संचालक पांडुरंग आंबटकर यांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. प्रमाणपत्र मिळताच उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये आनंदाची लाट उसळली.
या यशस्वी उपक्रमामागे सोमय्या ग्रुपचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मोठे योगदान असल्याचे संचालक पांडुरंग आंबटकर यांनी सांगितले. जगभरात अस्थिरता आणि संघर्ष वाढत असताना चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी शांततेचा संदेश देणारा हा विश्वविक्रम साकारल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी व्यक्त केले. भविष्यातही सामाजिक संदेश देणारे असे उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यापूर्वीही सोमय्या ग्रुपने १ मार्च रोजी तब्बल २७०० महिलांच्या सहभागातून लावणी नृत्य सादर करत जागतिक विक्रम नोंदवला होता. त्या उपक्रमालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे एका महिन्यात दोन जागतिक विक्रम नोंदवणारी ही संस्था ठरली आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात यापूर्वीही विविध क्षेत्रात जागतिक विक्रमांची नोंद झाली आहे. त्यात आता ‘मानवी शांतता चिन्ह’ या नव्या विक्रमाची भर पडली आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या नावावर आता एकूण चार जागतिक विक्रमांची नोंद झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. विद्यार्थ्यांनी साकारलेले हे ‘शांतीचे चिन्ह’ केवळ एक विक्रम नसून जगाला शांततेचा संदेश देणारा एक प्रेरणादायी प्रयत्न असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी जगाला दिलेला हा शांततेचा संदेश निश्चितच प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.