

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील २४३२ महिलांनी अवघ्या वीस मिनिटांत वीस लावण्या सादर करत जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वीचा १३२६ महिलांचा विक्रम मागे टाकत हा नवा विश्वविक्रम घडवण्यात आला. चांदा क्लब मैदानावर पार पडलेल्या या दिमाखदार उपक्रमाची अधिकृत नोंद गिनिज ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली.
चंद्रपूरच्या सांस्कृतिक परंपरेला जागतिक पातळीवर नवी ओळख मिळवून देणारी ही ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. उत्कृष्ट महिला मंच या संघटनेच्या पुढाकारातून साकारलेल्या या उपक्रमात तब्बल २४३२ महिलांनी सहभाग नोंदवला. ‘वीस मिनिटांत वीस लावण्या’ हे अत्यंत आव्हानात्मक उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे सर्व महिलांनी पारंपरिक वेशभूषेत, संपूर्ण लावणीच्या साज-श्रृंगारासह सादरीकरण केले.
यापूर्वी १३२६ महिलांचा असलेला विक्रम मोडीत काढत चंद्रपूरच्या महिलांनी नवा आदर्श निर्माण केला. या विक्रमासाठी गेल्या वर्षभरापासून नियोजनबद्ध तयारी करण्यात आली होती. शहरातील विविध भागांत नियमित सराव सत्रांचे आयोजन करण्यात आले. अनुभवी नृत्य प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. विशेष प्रशिक्षणासाठी हैदराबाद येथूनही प्रशिक्षक बोलावण्यात आला होता. प्रत्येक लावणीची निवड, ताल-लय, नृत्यरचना आणि सादरीकरण यावर काटेकोर मेहनत घेण्यात आली.
चांदा क्लब मैदानावर हा भव्य सोहळा पार पडला. मैदानावर एकसारख्या पोशाखात, शिस्तबद्ध पद्धतीने उभ्या असलेल्या हजारो महिलांनी लावणीच्या ठेक्यावर रंग भरला. पारंपरिक ढोलकीच्या तालावर आणि संगीताच्या साथीने सादर झालेल्या वीस लावण्यांनी उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. संपूर्ण सादरीकरण केवळ वीस मिनिटांच्या मर्यादेत पूर्ण करण्यात आले, ही बाब विशेष ठरली.
या ऐतिहासिक क्षणाची नोंद घेण्यासाठी गिनिज ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) च्या प्रतिनिधी सोनिया उशिरागोची या प्रत्यक्ष उपस्थित होत्या. त्यांनी सर्व निकषांची पडताळणी करून अधिकृत घोषणा केली. त्यानंतर मैदानावर जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. महिलांनी एकमेकींचे अभिनंदन करत आनंदोत्सव साजरा केला.
उत्कृष्ट महिला मंचच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हा उपक्रम केवळ विक्रम प्रस्थापित करण्यापुरता मर्यादित नसून महिलांच्या एकजुटीचे आणि सामूहिक शक्तीचे दर्शन घडवणारा आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना एकत्र आणत त्यांच्यातील कला आणि आत्मविश्वासाला व्यासपीठ देणे हा या मागचा मुख्य हेतू होता. वर्षभर चाललेल्या सरावामुळे महिलांमध्ये शिस्त, संघभावना आणि सांस्कृतिक अभिमान अधिक दृढ झाला.
लावणी हा महाराष्ट्राच्या लोककलेचा अविभाज्य भाग आहे. या कलेला जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न या विक्रमातून साध्य झाला आहे. विविध वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने हा कार्यक्रम अधिक रंगतदार ठरला. काही महिलांसाठी हा पहिलाच सार्वजनिक सादरीकरणाचा अनुभव होता; मात्र त्यांनी आत्मविश्वासाने मंच गाजवला.
या उपक्रमामुळे चंद्रपूर शहराची ओळख सांस्कृतिक नकाशावर अधिक ठळक झाली आहे. महिलांच्या सहभागामुळे सामाजिक एकात्मतेचा संदेशही देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या परिश्रमांचे कौतुक करत हा क्षण चंद्रपूरसाठी अभिमानास्पद असल्याचे मत व्यक्त केले. एक वैशिष्ट्यपूर्ण, नियोजनबद्ध आणि सामूहिक प्रयत्नांतून साकारलेल्या या विश्वविक्रमाने चंद्रपूरच्या महिलांनी इतिहास रचला आहे. त्यांच्या या कर्तृत्वामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, पुढील काळात अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे सांस्कृतिक परंपरेचा वारसा अधिक बळकट करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.