

मुंबई : अंधेरीमध्ये एका विवाहित मुलीने प्रियकराच्या मदतीने वडिलांना मारहाण केली. यात वडिलांचा मृत्यू झाला. शंकर कांबळे (वय ५८) असे त्यांचे नाव आहे. मुलगी सोनाली आणि तिचा प्रियकर महेश पांडे 'लिव्ह इन'मध्ये राहत होते. या नात्याला वडिलांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी मिळून हे कृत्य केले असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनालीचे लग्न २००८ मध्ये झाले होते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे. पण पतीसोबत तिचे जमत नव्हते, त्यामुळे २०२२ पासून ती महेश पांडे नावाच्या तरुणासोबत राहत होती. हे प्रेमसंबंध शंकर कांबळे यांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी सोनालीसोबतचे संबंध तोडले होते.
वडिलांनी वारंवार समजावूनही तिने ऐकले नाही. त्यामुळे ११ जून रोजी सोनाली आणि महेश, शंकर काम करत असलेल्या ठिकाण पोहोचले. एका हॉटेलजवळ दोघांनी शंकर यांच्यासोबत वाद घातला तिथेच त्यांना मारहाण केली.
मारहाण होत असल्याचे समजताच सोनालीचा भाऊ तिथे पोहोचला. त्याने महेशल थांबवण्याचा प्रयत्न केला. महेशने शंकर यांना छातीत मारल्याने ते खाली कोसळले आणि बेशुद्ध पडले असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दरम्यान, शंकर यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांन मृत घोषित केले. दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले.