

Chandrapur Warora Illegal Nylon Manja
चंद्रपूर : मानवी जीवन आणि पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक ठरणाऱ्या प्रतिबंधित नायलॉन मांजाविरोधात चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी गोपनीय माहितीच्या आधारे वरोरा शहरात कारवाई करत मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाचा साठा जप्त केला असून संबंधित महिला दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल १२ डिसेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन वरोरा हद्दीत कारवाई करण्यात आली. आझाद वॉर्ड, वरोरा येथील सौ. गीता तुळशीराम पानघाटे (वय ४०) यांच्या दुकानात पंचासमक्ष झडती घेतली असता पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा, मानवी जीवनास व पर्यावरणास घातक असा प्रतिबंधित नायलॉन मांजा अवैधरित्या विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.
या कारवाईत एकूण ४५ (काही नोंदीप्रमाणे ५४) प्लास्टिक चक्रींमध्ये साठवलेला नायलॉन मांजा, अंदाजे किंमत रुपये ५४,००० असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर जप्त मालाबाबत पोलीस स्टेशन वरोरा येथे भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २२३, २९२, ४९ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत कलम ५ व १५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोहवा जयसिंग, सचिन गुरनुले, संतोष येलपुलवार, निती रायपुरे, दिनेश अराडे आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
दरम्यान, चंद्रपूर पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही घाऊक अथवा किरकोळ व्यापारी प्रतिबंधित नायलॉन मांजा साठविताना किंवा विक्री करताना आढळून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष, चंद्रपूर येथील हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क साधून माहिती द्यावी. अशा धोकादायक प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.