

चंद्रपूर : आठवडाभरापासून आणि मागील चोवीस तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यांपैकी ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, १,३७८ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. 130 गावातील ४ हजार ३८ शेतकरी सकंटात सापडले आहेत. विशेष म्हणजे सर्वात जास्त नुकसान कापूस पिकाचे झाले असून 1339 हेक्टरवरील पिके नष्ट झालीत तर 135 हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे.
सर्वाधिक फटका कापूस शेतीला
आठवडाभरापासून जिल्ह्यात अतिवृष्टी, संततधार पाऊस पडत असल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरस्थितीमुळै 130 गावांतील 4038 शेतकऱ्यांचे 1378. हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, धान, तूर, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकतीच जिल्हा प्रशासनाने नुकसानीची आकडेवारी जाहीर केली आहे. १३ ते १९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत झालेल्या आणि मागील चोवीस तासात जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे सर्वातजास्त फटका कापूस, सोयाबीन पिकांना बसला आहे. त्यानंतर धान, तूर, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. मागील चौवीस तासात झालेल्या मुसळधार पावसाने पिकांची मोठी हाणी झाली असून ही आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राजूरा तालुका सर्वात जास्त प्रभावित
राजुरा तालुक्यात सर्वात जास्त कापूस व सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. या तालुक्यात ३७७ हेक्टरवरील पिके बाधित झाले असून 52 गावातील १,६४० शेतकरी संकटात सापडले आहेत. सर्वात जास्त शेतकऱ्यांचे नुकसान राजुऱ्यामध्ये झाले आहे. त्यांनतर बल्लारपूर तालुक्यात सर्वाज जास्त ४३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून,18 गावे प्रभावित झाले असून ९५० शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, धान, तूर आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. चंद्रपूर लगत असलेल्या या तालुक्यात कापूस, सोयाबीन व काही भागात धानाचीलागवड केली जाते. तर नदी काठावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतात.
भाजीपाल्याचे १५ हेक्टर क्षेत्र उद्ध्वस्त
गोंडपिपरी तालुकाही कापूस, सोयाबीन व काही ठिकाणी धानासाठी प्रसिध्द आहे. येथे ३९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. 25 गावातील १,२०० शेतकऱ्यांच्या शेतातील पिके बाधित झाली आहेत. त्याचबरोबर चंद्रपूर तालुक्यात ८३ हेक्टर, कोरपना ३० हेक्टर, भद्रावती ५७ हेक्टर तर वरोरा तालुक्यात ५७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे १३५ हेक्टर, कापसाचे तब्बल १,१३९ हेक्टर, तुरीचे ८ हेक्टर, तर भाजीपाल्याचे १५ हेक्टर क्षेत्र मुसळधार व पुरस्थितीमुळे उद्ध्वस्त झाले आहे.
कोरपना तालुक्यात कापूस व सोयाबीन हे प्रमुख पिक आहे. या तालुक्यातून वाहणारी पैनगंगा नदी दुथडी वाहत आहे. तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात झालेली अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील इसापूरचे नऊ व सातनाला धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आल्याने पैनगंगा व वर्धेला पुर आला आहे. नदीकाठावरील व छोट्यानाल्यांना पुर आल्याने शेकडो हेक्टर वरील कापूस व सोयाबीन पिके पाण्याखाली आली आहेत. सध्या या तालुक्यात 30 हेक्टरवरील कापूस व सोयाबी पिकांचे नुकसान झाले आहे. मागील चौवीस तासात काही तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला जावे लागण्याची शक्यता आहे. नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. आणि संतंतधार पाऊस सुरू असल्याने पुरस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर पिकांच्या नुकसानीमुळै पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढावले आहे. मागील काही महिण्यात जिल्ह्यात शेतकऱ्यांना बऱ्याचवेळा नैसर्गीक संकटाला सामोरे जावे लागले आहे. त्यानंतर पुन्हा जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण होत असल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कर्जबाजारीपणाची टांगती तलवार डोक्यावर असताना शेतकरी वांरवार नैसर्गीक संकटात सापडत असल्याने घायकुतीस आला आहे.