Chandrapur Tiger Terror | वाघाची दहशत, वन कार्यालयासमोर भर पावसात ग्रामस्थांचा एल्गार; 5 तास ठिय्या आंदोलनानंतर जेरबंदीचा आदेश

खडसंगी बफर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर शेकडो ग्रामस्थांचे आंदोलन; लेखी आदेश मिळेपर्यंत हटण्यास नकार, महिला भजन मंडळाचे गांधीगिरी आंदोलन
Khadsangi Buffer Zone Protest
खडसंगी बफर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत वनविभागाला चांगलेच धारेवर धरलेPudhari
Published on
Updated on

Khadsangi Buffer Zone Protest

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील बरडघाट, पांढरपौनी, झरी, खडसंगी आणि परिसरातील गावांमध्ये वाघाच्या वाढत्या दहशतीमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी ( दि. १६) खडसंगी बफर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत वनविभागाला चांगलेच धारेवर धरले. भर पावसात तब्बल पाच तास आंदोलन सुरू ठेवत वाघाला तातडीने जेरबंद करण्याचा लेखी आदेश मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. अखेर उपवनसंरक्षकांकडून वाघाला जेरबंद करण्याचा आदेश प्राप्त झाल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.

बरडघाट, पांढरपौनी, झरी, खडसंगी व परिसरातील गावांमध्ये वाघाच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी ११ वाजता शेकडो ग्रामस्थांनी खडसंगी बफर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले. मुसळधार पाऊस सुरू असतानाही ग्रामस्थांनी आंदोलन सुरू ठेवत वनविभागाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.

Khadsangi Buffer Zone Protest
Chandrapur News | मनुष्यबळाअभावी तळोधी (बा.) अपर तहसील कार्यालयाची दुरवस्था

परिसरातील वहानगाव येथील शंकर दादाजी मसराम यांचा २३ एप्रिल २०२६ रोजी, तर नवेगाव (पुनर्वसन) येथील राजेंद्र तिमाजी भोयर यांचा ६ जुलै २०२६ रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या सलग घटनांमुळे शेतकरी, शेतमजूर, महिला आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे मानवी जीविताला धोका ठरत असलेल्या वाघाला तातडीने जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

राजेंद्र भोयर यांच्या मृत्यूनंतर वनविभागाने संबंधित वाघाला जेरबंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने प्रमोद श्रीरामे यांच्या नेतृत्वाखाली ११ जुलै रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक यांना खडसंगी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये वाघाला तातडीने जेरबंद करणे, संवेदनशील गावांमध्ये विशेष गस्त वाढविणे, नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबविणे तसेच वनविभागाने दिलेल्या आश्वासनांची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली होती. मागण्या मान्य न झाल्यास १६ जुलै रोजी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.

Khadsangi Buffer Zone Protest
Chandrapur news: एकोणा कोळसा खाणीत कोळशाच्या ढिगाऱ्याखाली दबून चालकाचा मृत्यू

ठरल्याप्रमाणे गुरुवारी ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. आंदोलनात महिलांच्या भजन मंडळाने भजनाच्या माध्यमातून गांधीगिरी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. तीन तास उलटल्यानंतरही लेखी आदेश न मिळाल्याने आंदोलकांनी कार्यालयाच्या गेटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

तब्बल पाच तासांच्या आंदोलनानंतर उपवनसंरक्षक साईतन्मय दुबे यांच्या ई-मेलद्वारे संबंधित वाघाला जेरबंद करण्याचा आदेश प्राप्त झाला. ही माहिती आंदोलनकर्त्यांना देण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आंदोलन मागे घेतले. आंदोलनावेळी पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Khadsangi Buffer Zone Protest
Chandrapur News : तेलंगणा वनविभागाने सांगणापूरमधील उभ्या पिकांवर चालवला ट्रॅक्टर; पिके उद्ध्वस्त

प्रमोद श्रीरामे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मनी रॉय, प्रशांत कोल्हे, जगदीश मेश्राम, शंकर नन्नावरे, ज्ञानेश्वर मेश्राम, वेणुदास बोरकर, सागर गेडाम, अनिल ढोणे, स्वप्नील श्रीरामे, प्रकाश रामटेके, विलास पुसनाके, प्रभाकर दोडके, इरफान पठाण, उमेश चट्टे, रामभाऊ मेश्राम, रूपचंद शास्त्रकार यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी, महिला व ग्रामस्थ सहभागी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news