Gosikhurd Water Release | दोन दिवसांत गोसेखुर्दचे पाणी सोडा, अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ

विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांचा अधिकाऱ्यांना अल्टिमेटम
Gosikhurd Project water release
गोसेखुर्द प्रकल्प pudhari photo
Published on
Updated on

Vijay Wadettiwar Irrigation Water Protest

चंद्रपूर : गोसेखुर्द धरणात मुबलक जलसाठा असताना शेतकऱ्यांना तहानलेले ठेवण्याचा प्रशासनाचा प्रकार आता अजिबात खपवून घेतला जाणार नाही. दोन दिवसांच्या आत सिंचनासाठी गोसेखुर्दचे पाणी सोडा, अन्यथा शेतकऱ्यांच्या संतापाचा ज्वालामुखी उसळेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा निर्वाणीचा इशारा विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी गोसेखुर्द विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

आ. वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांच्या दिरंगाईवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, शेतकऱ्यांच्या जीवावर कागदी घोडे नाचविण्याचे उद्योग तात्काळ बंद करा. गोसेखुर्द धरणात पाणी उपलब्ध असूनही ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचत नाही, ही प्रशासनाची निष्क्रियता आणि असंवेदनशीलतेची परिसीमा आहे.

Gosikhurd Project water release
Vijay Wadettiwar | "काम करून घेता, आठ महिने पगार देत नाही"; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

विदर्भातील शेतकरी आधीच नैसर्गिक संकटांशी झुंज देत आहे. आता प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्याच्या पिकांचा बळी जाणार असेल, तर आम्ही हातावर हात ठेवून बसणार नाही.  ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड आणि सावली परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. पाण्याअभावी पिके करपत असताना अधिकारी मात्र फाईलींच्या ढिगाऱ्यात निर्णय दडपून ठेवत आहेत. हा शेतकऱ्यांवर उघड अन्याय आहे.

शेतकरी रडत असताना अधिकारी एसी कार्यालयात बसून वेळकाढूपणा करत असतील, तर तो प्रकार आम्ही चालू देणार नाही. प्रशासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. दोन दिवसांत पाणी सोडले नाही, तर तीव्र जनआंदोलन उभे केले जाईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची आणि जनतेच्या रोषाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल.

Gosikhurd Project water release
Vijay Wadettiwar | तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा; मदतीच्या नावाखाली दिखावा नको – विजय वडेट्टीवार

यावेळी त्यांनी राज्य सरकारलाही धारेवर धरत, "शेतकऱ्यांना घोषणांचे गाजर दाखविण्यापेक्षा त्यांच्या शेतात पाणी पोहोचवा. अन्यथा सरकार आणि प्रशासन दोघांनाही शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल," असा इशारा दिला.

गोसेखुर्दचे पाणी तातडीने सोडण्याच्या मागणीने आता संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, पुढील दोन दिवसांत प्रशासन काय निर्णय घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. निर्णय झाला नाही तर रस्त्यावर उतरून निर्णायक लढा उभारला जाईल, असा स्पष्ट संदेश आ. वडेट्टीवार यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news