Chandrapur Tigers | चिंधीचक-चिंधीमालच्या शेतशिवारात दोन वाघांचे दर्शन

जनकापूर परिसरातील पूर्वीच्या वाघहल्ल्यांच्या घटनांमुळे शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीती; धान कापणीच्या हंगामात शेतीची कामे करायची कशी?
Chindhichak Chindhimal Tigers
Chindhichak Chindhimal TigersPudhari
Published on: 
Updated on: 

Chindhichak Chindhimal Tigers

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील चिंधीचक आणि चिंधीमाल परिसरातील शेतशिवारात रविवारी ( दि. २२) सायंकाळी दोन मोठ्या पट्टेदार वाघांचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या दीड किलोमीटरच्या अंतरावर दोन वेगवेगळ्या शेतांमध्ये हे वाघ आढळून आले. यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, धान कापणीचा हंगाम तोंडावर असताना शेतीची कामे करायची कशी, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास चिंधीमाल येथील धानाच्या शेतात रस्त्यालगत एक मोठा पट्टेदार वाघ नागरिकांना दिसला. वाघ दिसल्याची बातमी परिसरात पसरताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. नागरिकांची आरडाओरड सुरू झाल्यानंतरही वाघ काही वेळ शेतातच ठाण मांडून होता. त्यानंतर तो शेताच्या धुऱ्याने जंगलाच्या दिशेने निघून गेला.

Chindhichak Chindhimal Tigers
Chandrapur News| चंद्रपूरच्या बळीराजाला दिलासा! 'ओटीएस' योजनेअंतर्गत ३,७४७ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र

दरम्यान, या ठिकाणापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर भेंडारकर यांच्या शेतातही आणखी एक मोठा पट्टेदार वाघ आढळून आला. या वाघाचेही अनेक नागरिकांना दर्शन झाले. एकाच वेळी जवळच्या दोन शेतशिवारांत दोन मोठे वाघ दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

विशेष म्हणजे, याच परिसरातील जनकापूर आणि चिंधीमाल तलावानजीक यापूर्वी वाघाच्या हल्ल्यात दोघांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेता शेतकरी आणि शेतमजुरांच्या मनात भीती अधिकच वाढली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात धानशेती असून सध्या अनेक शेतांमध्ये धान कापणीसह अन्य शेतीची कामे बाकी आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने शेतीची कामे काहीशी थांबली होती. मात्र, आता शेतशिवारातच वाघांचे दर्शन होत असल्याने शेतात जाण्यास शेतकरी आणि मजूर धजावत नाहीत. शेतकरी सकाळी शेतात जातात आणि सायंकाळपर्यंत काम करतात. अशा परिस्थितीत वाघांचा वावर वाढल्यास त्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

Chindhichak Chindhimal Tigers
Chandrapur Six Girls Escaped | चंद्रपूर सुधारगृहातून पळून आलेल्या सहा मुली हिंगणघाट पोलिसांच्या सुखरूप ताब्यात 

वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा

धान कापणीचा हंगाम जवळ आला असताना शेतशिवारात वाघांचा मुक्तसंचार सुरू असल्याने शेतीची उर्वरित कामे कशी पूर्ण करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. वनविभागाने या परिसरात तातडीने गस्त वाढवावी, वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यापूर्वीच्या वाघहल्ल्यांत दोघांचा बळी गेल्यानंतरही पुन्हा शेतशिवारात वाघांचे दर्शन होत असल्याने आता एखादी जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.