

चंद्रपूरः चंद्रपूर-मुल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वर गुरुवारी सकाळी ‘मामा मेल’ या प्रसिद्ध आणि धीट वाघाने तब्बल अर्धा तास ठिय्या मांडत वाहतुकीला अक्षरशः ब्रेक लावला. फायरलाईन परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूंनी गाड्यांच्या रांगा लागल्याने वनविभाग आणि पोलिसांना परिस्थिती हाताळण्यासाठी धावपळ करावी लागली.
चंद्रपूर-मुल महामार्गावरील फायरलाईन परिसरात सकाळच्या सुमारास ‘मामा मेल’ हा विदर्भातील अतिशय धीट वाघ रस्त्याच्या अगदी मध्ये येऊन बसला. गाड्यांची उपस्थिती आणि मोठा आवाज याची कसलीही दखल न घेता हा वाघ शांतपणे रस्त्यावर बसून राहिला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी अर्धा तास ठप्प झाली.
या घटनेपूर्वी ‘मामा मेल’ ने याच परिसरात दोन बैलांची शिकार केल्यामुळे तो रस्त्यालगत फिरत असल्याची माहिती आधीच वनविभागाकडे होती. त्याच अनुषंगाने वनविभागाचे कर्मचारी परिसरात सतर्क होते. वाघ दिसताच त्यांनी तत्काळ मोटारचालकांना सावध करून वाहतूक थांबवली आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
मामा मेल’ हा अगदी निर्धास्तपणे वाहनांची आणि माणसांची उपस्थिती सहन करणारा वाघ म्हणून जिल्ह्यात ओळखला जातो. अनेकदा नागरी भागालगत किंवा रस्त्यांवर दिसून नागरिकांमध्ये भीतीचे तसेच कुतूहलाचे वातावरण निर्माण करणारा हा वाघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
महामार्ग क्रमांक 930 हा गेल्या काही दिवसांपासून वन्यजीव हालचालींमुळे वारंवार चर्चेत राहिला आहे. या मार्गावर वाघ, बिबटे आणि इतर वन्यप्राणी वारंवार दिसू लागल्यामुळे मोटारचालकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी योग्य अंतर ठेवत परिस्थितीवर लक्ष ठेवले. काही वेळानंतर वाघ स्वतःहून जंगलभागाकडे निघून गेल्यानंतरच वाहतूक सुरळीत करण्यात आली.