Chandrapur Tiger Attack : पळसगावात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; तीन तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर वनविभागाची लेखी हमी

वारसाला शासकीय नोकरीचा प्रस्ताव पाठवणार, ५० हजारांची तातडीची मदत; वाघाला जेरबंद करण्यासाठी हालचाली सुरू
Chandrapur Tiger Attack : पळसगावात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; तीन तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर वनविभागाची लेखी हमी
Published on: 
Updated on: 

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे जंगलालगतच्या शेतात काम करत असताना वाघाने केलेल्या हल्ल्यात उषा अंकुश गुरुनुले (वय ४५) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली. संतप्त कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी वनविभागाच्या वाहनासमोर तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन करत मृतदेह उचलण्यास विरोध केला. अखेर वनविभागाने कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची तातडीची मदत देत, वारसाला शासकीय नोकरीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याची लेखी हमी दिल्यानंतर तणाव निवळला.

तीन तासांचा तीव्र रोष, लेखी हमीनंतर अंत्यसंस्कार

उषा गुरुनुले शेतात काम करत असताना वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवून ठार केले. घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेत मृतदेह रोखून धरला. मृत महिलेच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थ व नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मृतदेह चिमूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

शनिवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह गावात आणल्यावर ठोस व स्टॅम्प पेपरवर लेखी हमी मिळावी म्हणून ग्रामस्थांनी पुन्हा आक्रमक होत वनविभागाचे वाहन अडवले. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजूत काढत लेखी पूर्तता केल्यानंतर वातावरण शांत झाले आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तातडीची आर्थिक मदत, नोकरीच्या निर्णयाकडे लक्ष

कुटुंबातील कर्त्या महिलेच्या जाण्याने गुरुनुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वनविभागाने तत्काळ ५० हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली असून, मुलांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवण्याचे मान्य केले आहे. हा प्रस्ताव मंजूर करून प्रत्यक्ष नोकरी कधी मिळते, याकडे आता कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.

ट्रॅप कॅमेरे सक्रिय; वाघाला जेरबंद करण्यासाठी हालचाली

घटनेनंतर वनविभागाने परिसरात वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. शेताजवळील वाढलेली झुडपे व काटेरी वनस्पती हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा वाघ 'बेला' वाघिणीचा बछडा असण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. या वाघाला तत्काळ जेरबंद करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर परवानगी मिळवण्याच्या हालचाली सुरू आहेत. या घटनेमुळे शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news