

चंद्रपूर : रोजच्या उदरनिर्वाहासाठी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. मोहर्ली वनपरिक्षेत्रातील आगरझरी-२ बीटमध्ये सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
मंदा सूर्यभान मंगाम (वय ६०, रा. आगरझरी) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या राखीव वन कक्ष क्रमांक १८७ लगत असलेल्या सर्व्हे क्रमांक १०/४ मधील स्वतःच्या शेतात काम करीत होत्या. दुपारच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घालून गंभीर जखमी केले, ज्यात त्यांचा जागीच प्राण गेला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच दुर्गापूर पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे आणि पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला.
त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदनासाठी) जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठविण्यात आला. शेतात काम करणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने आगरझरी परिसरातील नागरिकांमध्ये वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.