चंद्रपूर: खासगीकरण, कंत्राटीकरणाविरोधात विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

चंद्रपूर: खासगीकरण, कंत्राटीकरणाविरोधात विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
Published on
Updated on

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने बाह्ययंत्रणेमार्फत सुरू केलेली कंत्राटी पदभरती रद्द करावी, 'दत्तक शाळा योजना' रद्द करावी, राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, एम.पी.एस.सी व इतर विभागाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेचे शुल्क कमी करून शंभर रुपये ठेवावे, यासह विविध मागण्यांना घेऊन शिक्षण – नोकरी बचाव समिती, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने आज शुक्रवारी जिल्हाभरातील हजारो विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने ६ सप्टेंबर २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित केला. त्यानुसार शिक्षण व विविध विभागात मनुष्यबळ बाह्ययंत्रणेमार्फत पुरविण्यात येणार आहे. हा शासन आदेश तात्काळ रद्द करून सर्व विभागातील रिक्त जागेवर कायमस्वरूपी पदभरती करावी. 'दत्तक शाळा योजना' राबविण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा, एनपीएस रद्द करून शिक्षक-राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, एमपीएससी व इतर विभागाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेचे शुल्क कमी करून शंभर रुपये ठेवावे, आयबीपीएस व टिसीएस किंवा इतर खासगी संस्थामार्फत विविध पदाच्या स्पर्धा परिक्षा न घेता,सर्व परिक्षा एमपीएसी आयोगाद्वारे घेण्यात यावे, विविध शासकीय पदभरतीसाठी होणाऱ्या स्पर्धा परिक्षेतील पेपर फुटीवर नियंत्रण आणण्यासाठी कडक कायदा करण्यात यावा, विद्यार्थी हितासाठी २० पटाखालील शाळा बंद होऊ नयेत, यासाठी समूह शाळा संकल्पना रद्द करावी, शासकीय कार्यालयातील रिक्त पदे व अनुदानित संस्थेमधील शिक्षक – प्राध्यापकांची रिक्त पदे तात्काळ भरावी आदी मागण्यां जनआक्रोश मोर्चा दरम्यान करण्यात आल्या.

ऐतिहासीक दीक्षाभूमी (डॉ. आंबेडकर कॉलेज) येथून चंद्रपूर मोर्चाला सुरूवात झाली. शहरातील मुख्य मार्गाने हजारो विद्यार्थी, युवक, पालक, कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक यांनी रस्त्यावर उतरून सरकारने घेतलेल्या खासगीकरण व कंत्राटीकरण धोरणाचा कडाडून विरोध केला. हजारोंच्या संख्येत उपस्थित विद्यार्थी व पालक व नागरिकांचा जनआक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चा मध्ये आमदार सुधाकर अडबाले, आमदार अभिजीत वंजारी, आमदार प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती होती. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शासनाने घेतलेल्या धोरणाचा कडाडून विरोध केला. सरकारने खासगीकरण, कंत्राटीकरणाविरोधात घेतलेले निर्णय रद्द करावे याकरीता जिल्हाधिकारी यांचे मार्फतीने सरकारला निवेदन सादर केले. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थी जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news