चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार | पुढारी

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा: मूल जंगलात जनावरे चरण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. त्यात गुराखी जागीच ठार झाला. ही  घटना मूल तालुक्यातील महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या जानाळा बीट कक्ष क्रमांक ५२३ मध्ये आज (दि.२०) दुपारी ३ च्या सुमारास घडली. बंडू विठ्ठल भेंडारे (वय ५८, रा. कांतापेठ) असे मृत गुराख्याचे नाव आहे.

मूल तालुक्यातील मौजा कांतापेठ येथील बंडू विठ्ठल भेंडारे हा नेहमीप्रमाणे  गुरे चराईसाठी गावा लगतच्या जंगलात  गेला होता. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने बंडूवर दुपारच्या सुमारास अचानक हल्ला चढवला. वाघाच्या हल्ल्यामुळे दुपारच्या सुमारास वनविकास महामंडळाच्या जंगलाकडून गुरे गावाच्या दिशेने पळू लागली. त्यामुळे काही नागरिकांना संशय आल्याने नागरिकांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. तो पर्यंत बंडू भेंडारे वाघाच्या हल्ल्यात जागीच ठार झालेला होता.  या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली.

वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. बोथे,वणपाल आर.जी. कुमरे, वनरक्षक यु.आर.गवई, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा झाल्यानंतर मृत्तदेह मूल येथील उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. वाघाच्या हल्ल्यात वारंवार घटना घडत असल्याने तालुक्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचत आहे. त्यामुळे येथे घटनास्थळी काही काळ नागरिकांचा  तणाव निर्माण झालेला होता. मूल तालुक्याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन तसेच वनविकास महामंडळ आणि प्रादेशिक वनविभागाचा बराचसा भाग लाभलेला आहे.

गावालगत वनव्याप्त भाग असल्याने मानव वन्यजीव संघर्ष हा रोजचाच झालेला आहे. नुकतेच दोन दिवसाआधी तालुक्यातील राजगडच्या डोंगरावर वाघ आढळल्याने नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिचाळा येथे मागील महिन्यात वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केलेला होता. वाघाच्या हल्ल्यात शेतकरी, शेतमजूर तसेच गुराख्यांचे बळी जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मूल तालुका हा धान उत्पादक क्षेत्र असल्याने सध्या शेतीत धान्याचे पीक उभे आहे. धानाला पाणी करणे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांना दररोज शेतावर जावे लागते. आता वाघाच्या हल्ल्यामुळे शेतीकडे लक्ष कसे द्यायचे?  पाळीव जनावरे सुद्धा चरायला न्यायची कुठे? असे प्रश्न या निमित्ताने उभा ठाकले आहे. मानव वन्यजीव संघर्षात आत्तापर्यंत 50 च्या वर बळी गेलेले आहेत. वनविभागाने याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

हेही वाचा 

Back to top button