

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील डोंगरगाव येथे आज मंगळवारी सकाळी एक नर अस्वल घरात घुसल्याने एकच खळबळ उडाली. मात्र गावकऱ्यांचे धैर्य, वन विभागाची तातडीची कारवाई आणि तज्ज्ञ पथकाच्या मदतीने ही धोकादायक परिस्थिती अत्यंत सुरक्षितपणे हाताळण्यात आली. अखेर अस्वलाला बेशुद्ध करून चंद्रपूर येथील टायगर ट्रान्झिट सेंटर (TTC) येथे हलविण्यात आले.
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बीटमधील डोंगरगाव येथे सकाळच्या शांत वातावरणात अचानक गावकऱ्यांनी एक मोठे, पूर्ण विकसित नर अस्वल गावात प्रवेश करताना पाहिले. गावाजवळील बोरीच्या झाडांवरील मधाचे पोळे खाण्यासाठी रात्री गाव परिसरात येणाऱ्या या अस्वलाने सकाळी थेट वस्तीमध्ये प्रवेश केला. यामुळे काही काळ गावात भीती आणि गोंधळ पसरला.
याच गोंधळात सुंदर कवडू जुमनाके यांनी घराबाहेर येऊन परिस्थिती पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु अस्वल अचानक त्यांच्या दिशेने येऊ लागल्याने ते घाबरून घरात पळाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अस्वलही थेट त्यांच्या घरातच घुसले. प्रसंगाची जाणीव होताच जुमनाके यांनी चातुर्याने घराचे दार बंद केले आणि अस्वल घरामध्येच कैद झाले. त्यांनी तात्काळ बीट गार्ड सचिन चौधरी यांना माहिती दिली.
माहिती मिळताच ब्रह्मपुरी वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपवनसंरक्षक ए. आर. कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार (बोरावार) यांनी रेस्क्यू ऑपरेशनची पूर्ण जबाबदारी स्वीकारली. अस्वलाला सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यासाठी चंद्रपूर येथून डॉ. रविकांत खोब्रागडे आणि शूटर अजय मराठे यांची विशेष रेस्क्यू टीम बोलावण्यात आली.
घटना विशेष म्हणजे—संपूर्ण गोंधळ, गर्दी, आवाज असूनही अस्वल घराच्या एका कोपऱ्यात शांतपणे झोपूनच होते. सकाळी अकराच्या सुमारास तज्ज्ञांनी योग्य अंतर व वेळ साधून अस्वलाला सुरक्षितपणे बेशुद्ध केले. त्यानंतर अस्वलाला कोणतीही दुखापत न होऊ देता काळजीपूर्वक घराबाहेर काढून वाहनाद्वारे चंद्रपूरच्या टायगर ट्रान्झिट सेंटर (TTC) येथे हलवण्यात आले.
या यशस्वी मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले, सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील सर्व वनकर्मचारी, ‘स्वाब’ संस्थेचे बचाव दल प्रमुख जीवेश सयाम आणि त्यांची संपूर्ण टीम, गावचे पोलीस पाटील योगेश लोंढे, सरपंच माधुरी मसराम, माजी सरपंच मनीषा आगडे तसेच गावकरी यांनी धैर्याने आणि शिस्तबद्धरित्या सहकार्य केले.