

Heat Wave Chandrapur
चंद्रपूर: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाने उच्चांक गाठला असून, 45 अंशांच्या पुढे गेलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता सर्व शाळा आणि महाविद्यालये सकाळी 7 ते 11 या वेळेतच भरवली जाणार आहेत. जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा मोठा प्रभाव जाणवत असल्याने चंद्रपूरला 22 एप्रिल 2025 रोजी "नैसर्गिक आपत्ती जिल्हा" म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
शाळांमध्ये पंखे, कुलर कार्यरत ठेवणे बंधनकारक
मैदानी खेळांवर बंदी, उन्हात वर्ग न घेण्याच्या सूचना
थंड वर्ग खोल्या, पिण्याचे पाणी आणि प्रथमोपचार उपलब्ध असणे अनिवार्य
शिक्षणाधिकारी अश्विनी केळकर (प्राथमिक) आणि राजेश पातळे (माध्यमिक) यांनी सर्व शाळांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षाही सकाळच्या सत्रातच घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यामुळे पालकवर्गानेही समाधान व्यक्त केले आहे.