

Rupala Mendha Lake
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील जवराबोडी मेंढा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रुपाळा मेंढा (आकापूर) येथील तलावात मागील तीन दिवसांपासून दिसणाऱ्या गूढ पिवळसर प्रकाशामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेबाबत विविध तर्क-वितर्क, श्रद्धा-अंधश्रद्धेच्या चर्चा रंगत असतानाच चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने केलेल्या तपासात या रहस्यमय प्रकाशाचे खरे कारण समोर आले आहे. एसडीआरएफच्या शोधमोहीमेत तलावातून चालू अवस्थेतील चार्जिंग एलईडी बल्ब आढळून आल्याने या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
रुपाळा मेंढा (आकापूर) गावालगतच्या तलावात रात्रीच्या वेळी दर मिनिटाला पिवळसर रंगाचा प्रकाश लुकलुकताना दिसत असल्याने मागील तीन दिवसांपासून परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहलाचे वातावरण होते. या घटनेची माहिती पसरताच चौगान, जुगनाळा, गवर्ला, जवराबोडी, कसर्ला आदी गावांतील नागरिकांनी रात्रीच्या वेळी तलाव परिसरात मोठी गर्दी केली होती.
तलावाजवळ हनुमान मंदिर असल्याने काहींनी या घटनेकडे श्रद्धेच्या दृष्टीने पाहिले, तर काहींनी यामागे नैसर्गिक किंवा वैज्ञानिक कारण असावे, असा अंदाज व्यक्त केला होता. भूगर्भ संशोधक सुरेश चोपणे यांनीही प्राथमिक स्तरावर हा प्रकाश काजव्यांमुळे असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली होती. मात्र, त्यांनी घटनास्थळी वैज्ञानिक पाहणी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असेही नमूद केले होते.
दरम्यान, या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अधिनस्त असलेल्या एसडीआरएफ (State Disaster Response Force) पथकाने तलावात उतरून सखोल शोधमोहीम राबविली. शोधादरम्यान तलावातून चालू अवस्थेतील चार्जिंग एलईडी बल्ब मिळून आला. हा बल्ब ब्लिंकिंग मोडमध्ये सुरू असल्याने त्याचा प्रकाश पाण्यावर पडत होता आणि त्यामुळेच नागरिकांना पाण्यातून गूढ प्रकाश येत असल्याचा भास होत होता, हे स्पष्ट झाले.
या निष्कर्षानंतर तलावातील प्रकाशामागे कोणतेही दैवी, अलौकिक किंवा गूढ कारण नसल्याचे स्पष्ट झाले असून, मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवा किंवा अपप्रचारावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.