

Heavy rain alert Chandrapur
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात काल सायंकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून आज (दि.२५) पहाटेपासूनही जोरदार पावसाचा धुमशान सुरूच आहे. हवामान खात्याने आज चंद्रपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली, त्यानंतर जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व अंगणवाडी केंद्रांना आज तातडीची सुट्टी जाहीर केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवसांपासून विसावलेला पाऊस दोन दिवसांपूर्वी पुन्हा सुरू झाला आहे. काही ठिकाणी चांगलाच तर काही ठिकाणी अत्यलप प्रमाणात कोसळत आहे. काल गुरूवार पासुन वातावरणात बदल झाला. सायंकाळ पासून पावसाला सुरूवात झाली. वादळी वाऱ्यासह काही भागात जोरदार पाऊस पडला. त्यानंतर काही वेळ विसावला. पुन्हा रात्रभर रिपरिप पाऊस पडला. आज पहाटे पुन्हा जोरदार सुरूवात झाली. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. काथांबून थांबून पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पावसानंत लगेच उन्हाची चाहून दिसून येत आहे, परंतु जिल्ह्यात पावसाचे घुमशान सुरूच आहे.
हवामान खात्याने चंदपूर जिल्ह्यात एका दिवसासाठी ऑरेंज अलर्ट घोषीत केला आहे. जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. हवामान खात्याच्या इशारानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पाऊले उचलली आहेत.आज गुरूवारी चंद्रपूर जिल्ह्यात शाळांना तातडीने सुटी घोषीत करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार, आज सकाळी सुरू झालेल्या शाळांनी विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजेपर्यंत सुट्टी द्यावी आणि सुरक्षितपणे घरी पोहोचवावे. याबाबतचे आदेश सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने शाळांना सुटीचा निर्णय घेतला आहे.
पावसाळ्यात सुरू असलेल्या दमदार पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील मोठे, लघु, मध्यम प्रकल्प तुडुंब भरले आहेत. तलाव व धरणांमधून पाणी सोडले जात असल्याने नदी-नाल्यांची पातळी वाढत आहे. काल चंद्रपूर शहरालगच्या इरई धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणातील काही दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. इरई धरणाची पातळी २०७.३७५ मीटर इतकी झाली असून, तीन दरवाजे ०.२५ मीटर ने उघडण्यात आले आहेत. आणखी दोन दरवाजे उघडण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. प्रशासनाने नदी काठावरील गावांना नदी पात्र ओलांडू नये, जनावरांना नदीकाठी सोडू नये, नदी-नाले, पूल यांवरून जाणे टाळावे आदी सूचना देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहेतसेच शालेय विद्यार्थी व लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सतत चालू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात काही भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अर्धेअधिक जिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात जड, मध्यम व हलके जातीच्या धानाची लागवड केली जाते. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे.,ते शेतकरी जड मध्यम प्रतीच्या (जास्त कालावधीच्या) धानाची लागवड करतात. ज्यांच्याकडे सिंचन सुविधा नाही असे शेतकरी कोरडवाहू भागात हलक्या धानाची लागवड करतात. काही भागात हलके धान निसवले आहेत तर काही भागात निसवणे सुरू आहे. त्यामध्ये आता हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने शेतकरीचिंतातूर झाले आहे. एकापाठोपाठा एक नैसर्गीकआपत्तीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या पावसामुळे काही भागात हलक्या धानाचे नुकसान झाले आहे. निसवत असलेल्या धानालाही पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उन्हाळी हंगामात गारपिटीन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्यानंतर आता खरीप हंगामातील धान पिकावर पावसाची सक्रांत आली आहे. त्यामुळे मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोर जावे लागण्याची शक्यता शेतकरीवर्तवित आहेत.