

चंद्रपूर : शेतावर काम करीत असताना महिलांवर विज पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सिंदेवाही तालुक्यात पेटगाव शेत शिवारात आज शुक्रवारी दुपारी घडली. आज शुक्रवारी (१८ जुलै २०२५) रोजी सिंदेवाही तालुक्यातील पेटगाव येथील काही महिला धान रोवणी करण्यासाठी गावापासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर असलेल्या विरव्हा शिवारातील चंदू टेकाम यांच्या शेतात गेल्या होत्या. दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास आकाशात अचानक विजेचा कडकडाट सुरू झाला आणि विज कोसळली.
या घटनेत पेटगाव येथील संगिता सचिन चौधरी (वय ३७) यांचा जागीच मृत्यू झाला, तर विठ्ठल केशव शेरकुरे (वय ४५), इंदिरा जनार्दन चौधरी (वय ४५), व जनार्दन तुळशिराम चौधरी हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ पेटगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतक महिलेचे शव घटनास्थळी पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, यावर्षी पेटगाव परिसरात विज पडून मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. सदर घटनेबाबत पोलिसांनी मर्ग नोंदवून पंचनामा केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद बावणे करीत आहेत. प्रशासनाने अशा घटनांपासून बचावासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, दुसरी घटना नागभीड तालुक्यातील जिवनापूर टोला येथे घडली. मारोती अप्पकवार यांच्या शेतात धान रोवणी सुरू असताना जोरदार पावसात गणेश पांडूरंग वालके (वय 28) यांच्यावर विज कोसळली. त्यांना गंभीर अवस्थेत सिंदेवाही येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतक गणेश यांची पत्नी कर्नाटकात रोवणीसाठी गेलेली असून त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
पेटगाव परिसरात यावर्षी विज पडून मृत्यू होण्याची ही दुसरी घटना असून, नागभीड तालुक्यातही अशाच प्रकारची ही तिसरी घटना असल्याचे सांगण्यात येते. या घटनांमुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.