

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील कोटगाव येथे आज शनिवारी (12 जुलै) ला सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या वैशाली श्रावण मोहरकर (वय ४५) या महिलेने गावातील नाल्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
वैशाली यांचे प्रेत आज सकाळी बोथली येथील नाल्यात तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसून आले. त्यांनी तात्काळ नागभीड पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतले. प्रेताचा पंचनामा केला असून, उत्तरीय तपासणीसाठी प्रेत नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
मृतक वैशालीचे पती श्रावण मोहरकर हे कोटगाव येथील कृषक वसतिगृहात गेली २५ वर्षे अल्पवेतनावर अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, सामाजिक न्याय विभागाकडून गेल्या मार्च महिन्यापासून त्यांना पगार मिळालेला नाही. यामुळे संपूर्ण कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले होते.
हीच आर्थिक विवंचना सहन न झाल्याने वैशाली यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुलांचा परिवार आहे.या दुर्दैवी घटनेमुळे कोटगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी शासनाने तातडीने पावले उचलावी, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.