Chandrapur Leopard Rescue | पहाटे बिबट घरात घुसला; चार तासांच्या थरारक मोहिमेनंतर वनविभागाकडून रेस्क्यू

नागभीड तालुक्यातील कोरंबी गावातील घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Leopard Saved In Nagbhid
तब्बल तीन ते चार तासांच्या थरारक बचाव मोहिमेनंतर बिबटाला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात यश आले Pudhari
Published on
Updated on

Leopard Saved In Nagbhid

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील कोरंबी गावात गुरुवारी (२ जुलै) पहाटे बिबट घरात घुसल्याने संपूर्ण गावात मोठी खळबळ उडाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही काळ गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तातडीच्या आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे तब्बल तीन ते चार तासांच्या थरारक बचाव मोहिमेनंतर बिबटाला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात यश आले असून, संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागभीडपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरंबी गावात पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास एका गोठ्यात अचानक बिबट शिरला. यावेळी लघुशंकेसाठी उठलेले विद्याधर नन्नावरे यांना बिबट दिसताच त्यांनी तत्काळ आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजामुळे परिसरातील नागरिक जागे झाले. मात्र गोंधळलेल्या अवस्थेत असलेला बिबट घाबरून महादेव नन्नावरे यांच्या घरात घुसला.

Leopard Saved In Nagbhid
Chandrapur crime: वरोरा येथे एलसीबीची धडक कारवाई; ५ लाखांचा विदेशी दारूसाठा जप्त, दोन आरोपी अटकेत

अचानक बिबट घरात शिरल्याची माहिती वाऱ्यासारखी गावभर पसरली आणि काही क्षणांतच गावात धावपळ उडाली. नागरिकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. भारती बगमारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव मोहिमेचे नेतृत्व केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक प्रशासनाने तातडीने संपूर्ण परिसर सुरक्षित केला. नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवण्यात आले तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात आले.

Leopard Saved In Nagbhid
Chandrapur Bribe Case : ८ हजारांची मागणी, ३ हजारांवर तडजोड; महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला लाच घेताना अटक

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चंद्रपूर येथून विशेष प्रशिक्षित ट्रँक्विलायझर (भूल) शूटर पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने अत्यंत संयम आणि नियोजनबद्ध पद्धतीने परिस्थिती हाताळत योग्य संधी साधून बिबटाला भूल दिली. भूल दिल्यानंतर वनविभागाच्या पथकाने बिबटाला सुरक्षितरीत्या जेरबंद केले. संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन सुमारे तीन ते चार तास चालले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पहिल्यांदाच बिबट गावात शिरल्याने कोरंबी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर चिंतेचा विषय बनत असून, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच वन्यप्राणी आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news