

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील विधी महाविद्यालय समोरील परिसरात किरकोळ वादातून एक तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, अवघ्या एका तासाच्या आत सर्व सहाही आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलिसांना यश आले आहे.
मृत युवकाचे नाव नितेश वासुदेव ठाकरे (वय २७) रा. वार्ड क्र.१, बेताल चौक, दुर्गापूर असे असून, तो रक्तबंबाळ अवस्थेत मृत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. आज गुरुवारी ( २३ ऑक्टोबर २०२५) विधी महाविद्यालय समोर एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक (स्थागुशा) आणि रामनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरात सखोल तपास आणि साक्षीदारांची चौकशी करून तपास पथकांनी गुन्हेगारांचा शोध वेगाने सुरू केला.
अवघ्या एका तासाच्या आत पोलिसांनी तपासाचा धागा पकडत आरोपींची ओळख पटवली आणि सर्व आरोपींना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात किरकोळ वादातूनच हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. त्या मध्ये करण गोपाल मेश्राम (वय २२), रा. भिमनगर, वार्ड क्र. ४, दुर्गापूर, यश छोटेलाल राऊत (वय १९), रा. भिमनगर, वार्ड क्र. ४, दुर्गापूर, अनिल रामेश्वर बोंडे (वय २२), रा. समता नगर, दुर्गापूर, प्रतिक माणिक मेश्राम (वय २२), रा. वार्ड क्र. ४, दुर्गापूर,तौसिक अजीज शेख (वय २३), रा. फातेमा मस्जिद जवळ, वार्ड क्र. ३, दुर्गापूर, सुजीत जयकुमार गणविर (वय २५), रा. भिमनगर, वार्ड क्र. ४, दुर्गापूर यांचा समावेश आहे.
यातील 5 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तर एका आरोपीस रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या प्रकरणात रामनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (स्थागुशा), पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख (रामनगर) यांचे नेतृत्वात सपोनि देवराव नरोटे, सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनिल गौरकार, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा इम्रान खान, पोहवा नितीन साळवे, पोहवा रजनीकांत पुठठावार, पोहवा दीपक डोंगरे, पोहवा अजय बागेसर, चापोहवा प्रमोद डंबारे, पोअं हिरालाल गुप्ता, पोअं शंशाक बदामवार, पोअं शेखर माधनकर यांच्या पथकाने कारवाई केली.