

चंद्रपूर : आसोलामेंढा तलावाच्या नहरामध्ये बुडणाऱ्या नातवाला वाचविताना आजोबाचाही बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.१८) सकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हिरापूर गावात घडली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. भगवानदास लाटेलवार (वय ६२) असे आजोबाचे तर रोहित राजू गोरंटवार (वय १४) नातवाचे नाव आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवानदास लाटेलवार हे आपल्या मुलीच्या घरी सावली तालुक्यातील हिरापूर येथे काही दिवसांपासून आले होते. काल शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास ते आपल्या नातवासह बकऱ्यांना चारा कापण्यासाठी आसोला-मेंढा तलावाच्या नहरकाठावर गेले होते. चारा कापताना रोहितचा तोल गेला आणि तो अचानक नहरामध्ये पडला. नातवाला नहरातील पाण्यात बुडताना पाहून आजोबा भगवानदास यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला नहरा मध्ये उडी घेतली. मात्र, नहरामधील पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की दोघेही काही क्षणातच वाहून गेले.
घटनेची माहिती मिळताच सावली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व स्थानिक नागरिकांनी शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीम जवळपास २४ तास सुरू होती. अखेर आज रविवारी सकाळी दोघांचे मृतदेह मूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत, हिरापूर गावापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर आढळून आले.
या घटनेमुळे हिरापूर आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आसोला-मेंढा नहर अत्यंत खोल व रुंद असून, तिच्या सिमेंट अस्तरीकरणामुळे पाण्यात पडलेल्या व्यक्तीला स्वतःहून बाहेर येणे जवळपास अशक्य असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा मागणी केली होती की, प्रत्येक १५० मीटरवर दोन्ही बाजूंना सीढ्या (स्टेप्स) तयार करण्यात याव्यात, ज्यामुळे अपघात झाल्यास जीव वाचवणे शक्य होईल. मात्र, जलसंपदा विभागाकडून अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
या नहरामध्ये अशा घटना नवीन नाहीत. केवळ दोन दिवसांपूर्वीच ६० वर्षीय केशव खोबरागडे नावाच्या व्यक्तीचा या नहरा मध्ये बुडून मृत्यू झाला होता. त्याचाही मृतदेह एक दिवसानंतर सापडला होता. त्यानंतरही या नगरामध्ये अपघाताची मालिका सुरूच आहे. नारा मधील अपघात टाळण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज नागरिक बोलून दाखवत आहेत. नातवाला वाचविण्यासाठी आजोबांनी नहरामध्ये घेतलेली ती उडी अखेर दोघांसाठी प्राणघातक ठरली. या दुर्घटनेने पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजना वेळेवर न केल्यास अशी हृदयद्रावक प्रकरणे पुन्हा पुन्हा घडत राहतील, हीच भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.