

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या २०२५–२६ सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ६६ जागांसाठी राजकीय पक्षांमध्ये अभूतपूर्व मोर्चेबांधणी पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत बिघाडीमुळे अनेक प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढत असल्याने यंदाची निवडणूक बहुरंगी, बहुकोनी आणि अत्यंत चुरशीची होण्याचे संकेत आहेत.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत यंदा महायुतीमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. युतीचा महत्त्वाचा घटक असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हा ४० जागांवर स्वबळावर निवडणूक लढवत असून, त्यामुळे महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे दोघे एकत्र निवडणूक मैदानात उतरले आहेत. युतीतील जागावाटपानुसार शिवसेना (शिंदे गट) ०८ जागा, तर भाजप ५८ जागांवर निवडणूक लढवत आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीतही बिघाडीचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेस पक्ष ६३ जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून, त्यांच्या सोबतीला स्थानिक प्रभाव असलेला जनविकास सेना पक्ष ३ जागांवर निवडणूक लढवत आहे. यामुळे शहरात काँग्रेस–जनविकास सेना अशी स्थानिक आघाडी अस्तित्वात आली आहे. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) देखील २५ जागांवर स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करत राजकीय संघर्षात उडी घेत आहे.
महाविकास आघाडीतील घटक असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडी यांनी परस्पर युती जाहीर केली असून, हे दोन्ही पक्ष प्रत्येकी ३३ जागांवर निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, आघाडीतील आणखी एक महत्त्वाचा घटक असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हा देखील ५५ जागांवर स्वबळावर निवडणूक लढत असल्याने निवडणुकीचे राजकीय चित्र अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.
राजकीय वातावरण आणि संकेत
महायुतीत भाजप आणि शिंदे गट एकत्र असले तरी अजित पवार गटाच्या स्वतंत्र लढतीमुळे मतविभागणी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला जनविकास सेनेची साथ, मात्र उबाठा–वंचित आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या स्वबळामुळे महाविकास आघाडीतील मतदारही विभागले जाण्याचे संकेत आहेत. मनसेच्या २५ जागांवरील स्वबळामुळे स्थानिक मुद्द्यांवर नवे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत.
युती–आघाडीतील अंतर्गत बिघाडी, अनेक पक्षांची स्वबळावर लढण्याची भूमिका आणि स्थानिक स्तरावर तयार झालेल्या नव्या आघाड्या यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेची ही निवडणूक राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक ठरणार आहे.