

चंद्रपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध कारणांमुळे आजपर्यंत पुढे ढकलल्या. मात्र, मंगळवारी (दि.६) सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यात स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिल्याने चंद्रपूरातील जिल्हा परिषद, महानगरपालिकांसह नगर परिषदांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजप, काँग्रेस या प्रमुख पक्षांसह अन्य पक्षाचे इच्छूक कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज आहेत. जिल्ह्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. काँग्रेसने अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याची मागणी केली होती, परंतु राज्य सरकारने त्यावर पाऊले उचलली नाहीत. अखेर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत निवडणूका घेण्याचे निर्देश दिल्याने निवडणूक घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये ६२ सदस्य संख्या आहे. ही संस्था १५ तालुक्यामध्ये कार्यरत आहे. मागील पाच वर्षांपासून मिनी मंत्रालयावर प्रशासक राजवट आहे. मुख्य कार्यकारी अधिकारीच जिल्हा परिषदेचा संपूर्ण कामकाज पाहत आहेत.
प्रशासक काळापूर्वी दोन पंचवार्षीकमध्ये भाजपाचीच सत्ता राहिली आहे. म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचेच वर्चस्व राहिले आहे. त्यांच्याच मर्जीतील सध्याचे विद्यमान आमदार देवराव भोंगळे व संध्याताई गुरूनुले यांनी अध्यक्षपदाचा कार्यकाळ भूषविला. दहा वर्षाच्या कार्यकाळात भाऊंच्या वर्चस्वाला धक्का बसला नाही. परंतु, यावेळी किशोर जोरगेवारांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. ते चंद्रपुरात भाजपचे आमदार म्हणून निवडून देखील आले. त्यांनी आपले प्राबल्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपमध्ये पक्षांतर्गत कलह वाढलेला आहे. पक्षांतर्गत विरोध करून सुधीर मुनगंटीवारांना विरोध होत असल्याने भाजपामध्ये दोन गट जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसले तर नवल नको. भाजपध्ये सध्या वर्चस्वाची लढाई सुरू आहे. वर्चस्वाच्या लढाईतून यावेळी जिल्हा परिषदेमध्ये कोणतेही समीकरण घडू शकते. दोन पंचवार्षिक पूर्वी काँग्रेसची सत्ता होती. सतीश वारजुकर यांनी अध्यक्षपदाची सुत्रे सांभाळली आहेत. त्यांनी संध्याताई गुरूनुले यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षाची भूमिका प्रबळपणे सांभाळली आहे. जिल्हा परिषदेच्याविरोधी पटलावर विविध मुद्यांनी त्यांनी आपला कार्यकाळ गाजविला आहे. त्यामुळे काँग्रेस मजबुतीने उभे राहणार आहे.
काँग्रसेच्या खासदार प्रतिभा धानोकर, माजी आमदार सुभाष धोटे यांचे सध्या चंद्रपूर जि.प.मध्ये चांगले वर्चस्व आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर लगेच विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या. त्यामध्ये मात्र, काँग्रेसला यशस्वी कामगिरी पार पाडता आली नाही. विधानसभेमध्ये भाजपची जादू चालली.
जिल्हा परिषदेच्या राजकारणावर नजर टाकली तर कधी भाजप तर कधी काँग्रेसची सत्ता राहिली आहे. पाच वर्षांनंतर आता कुणाची सत्ता येणार, हे सांगणे जरा कठीण आहे. त्याचे कारणही तसेच आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये आतापर्यंत फक्त सुधीर मुनगंटीवार यांचेच वर्चस्व राहिले आहे. मुनगंटीवार व जोरगेवार यांच्यात राजकीय संबंध सलोख्याचे नाहीत, हे जगजाहीर आहे. तसेच हंसराज अहीर यांचेसोबतही मुनगंटीवार यांचे राजकीय संबंध चांगले नाहीत. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधामुळे यावेळी भाजपालाही सत्तेसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. जोरगेवार यांचा गट सक्रीय होऊन जिल्हा परिषदेवर आपली ताकद दाखविल्याचा प्रयत्न करू शकतो. मागील दोन पंचवार्षिकमध्ये काँग्रेसला जि.प.वर सत्ता आणता आली नाही. त्यामुळे दहा वर्षानंतर सत्ता आणणे जरा कठिणच आहे. काँग्रेसमध्येही गटा-तटाचे राजकारण हेवे-दावे आहेत. प्रतिभा धानोरकर विरूद्ध विजय वडेट्टीवार यांचा नेहमी राजकीय सामना रंगतो. परंतू, आतापर्यंत वडेट्टीवार यांनी जिल्हा परिषदेमध्ये फारसे स्वारस्य दाखविले नाही. यावेळी ते शांत राहिले तर काँग्रेसमधील अंतर्गत कलह टळू शकतो. काँग्रेस भाजपसह अन्य पक्षांचे नेते गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज आहेत. त्यामुळे आता खरी रंगत सुरू होणार आहे.
नगरपरिषद म्हणून अस्तित्वात असलेल्या चंद्रपूर नगरपरिषदेची लोकंसख्या तीन लाखांहून अधिक झाल्याने २०११ मध्ये चंद्रपूर नगर परिषदेला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला. सध्या येथेही प्रशासक राजवट आहे. येथे १७ प्रभागात ६६ नगरसेवकांची संख्या आहे. यापूर्वी येथे बसपाच्या पाठिंब्याने भाजपाची सत्ता होती. म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचेच वर्चस्व होते. परंतू, जिल्हा परिषदेप्रमाणेच महानगरपालिकेमध्ये देखील भाजपची स्थिती आहे. सुधीर मुनगंटीवार यांचा पक्षांर्गत विरोध करणारा गट सक्रीय झाला तर या ठिकाणी देखील भाजपाला सत्तेसाठी संघर्ष करावा लागेल.
विशेष म्हणजे अनेक वर्षानंतर शोभाताई फडणवीस ह्या चंद्रपूरच्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. जोरगेवारांनी आयेाजित केलेल्या कार्यक्रमात त्यांची असलेली उपस्थिती मुनगंटीवारांच्या गटासाठी अडचणीची ठरू शकते. काँग्रेसचे रामू तिवारी यांच्या मदतीने प्रतिभा धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे हे देखील यावेळी सत्तेसाठी जोरदार प्रयत्नशील राहतील. काँग्रसेचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. काँग्रसमध्ये सत्ता प्राप्तीसाठी अंतर्गत कलह निवळला तर यावेळी त्यांनाही सत्तेची आशा करणे गैर नाही. सध्या तरी भाजप व काँग्रस निवडणुकीसाठी सज्ज आहेत. तर पप्पू देशमुख यांच्या जनविकास सेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. प्रशासक काळात महानगरपालिकेचा गैरकारभारावर त्यांनीच जोरदार टिका केली. विविध प्रकरणाने प्रशासकावर आरोप करून आपल्या कार्याने ते जनतेमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे सत्ता प्राप्तीचे त्यांचे स्वप्न गैर नाही. त्यांच्यासह विविध पक्ष व त्यांचे नेते सक्रिय आहेत. तेही आता तयारीला लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचा मार्ग मोकळा झाल्याने महानगर पालिकेची निवडणूक रंगतदार ठरणार आहे.