

चंद्रपूर : काही दिवसांची उसंत घेतल्यानंतर दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला. बुधवारी पावसाने चंद्रपूर शहर, राजुरा, कोरपना सिंदेवाही, बल्लारपूर व जिवती तालुक्यात दमदार हजेरी लावली. दुपारी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने चंद्रपुरकरांना झोडपून काढले. सायंकाळी पावसाची तीव्रता कमी झाली पण रात्री पावसाने संपूर्ण जिल्ह्याला कवेत घेतले.
गुरुवारी दिवसभर पावसाची रिप रिप सुरूच होती. जिल्ह्यातील 5 तालुक्याला अतिवृष्टीचा सामना करावा लागला. कोरपना तालुक्यात 102.7मिमी, बल्लारपूर येथे 94.0मिमी ,जिवती येथे 82.1मिमी,राजुरा येथे 75.4मिमी तर सिंदेवाही तालुक्यात 66.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. 5 तालुक्यात अतिवृष्टी व चौफेर पाऊस असल्याने नदी नाले आता ओसंडून वाहू लागले आहेत. हवामान खात्याने आता शुक्रवारी(दि 25) रेड अलर्ट जारी केला आहे. या सोबतच पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात (प्रामुख्याने पूर्व विदर्भात) 25-26 जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी दिलेल्या सूचनेनुसार शुक्रवार, 25 जुलैला चंद्रपूर जिल्ह्याकरिता रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. पूर्व आणि उत्तर विदर्भात सर्वात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्यात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे.सध्याच्या अंदाजानुसार 26 तारखेला पावसाचे प्रमाण सर्वात अधिक असण्याची शक्यता आहे.
25-26 जुलै दरम्यान पूर्व विदर्भात धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सखोल भागांमध्ये पुराची स्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.