

Chandrapur 18 roads closed
चंद्रपूर : मागील 24 तासांत चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान 68 मि.मी. नोंदविण्यात आले आहे. विशेषतः ब्रम्हपुरी तालुक्यात तब्बल 148.5 मि.मी., नागभिड येथे 99.4 मि.मी., सावली येथे 97.2 मि.मी., मूल 82.1 मि.मी. तर चिमूर येथे 72 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
या अतिवृष्टीमुळे अनेक नाले-नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील तब्बल 18 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मूल तालुक्यात काटवण मार्ग बंद झाला असून, लोकांना जाण्यासाठी मारोडा मार्ग खुला ठेवण्यात आला आहे. गोंडपिपरी तालुक्यात मोझा वेजगाव ते सरांडी नाल्यावर पाण्याची पातळी वाढल्याने बंद करण्यात आला आहे. आर्वी -धानोरा मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच तोहगाव- आर्वी व तोहगाव-पाचगाव रस्ता बंद झाला आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यात ब्रम्हपुरी चांदगाव, ब्रम्हपुरी- वडसा मार्ग तसेच रानबोथली ते ब्रम्हपुरी मार्ग पुराच्या पाणी पुलावर आल्याने मार्ग बंद झाला आहे. वाहतुक खंडित झाली आहे. राजुरा तालुक्यात सिंधी नाला पुलावरून पाणी वाहत असल्याने धानोरा सिंधी मार्ग बंद झाला आहे. चिचोली ते अंतरगाव व राजुरा-बामणी मार्ग बंद झाला असून या मार्गाची वाहतुक सास्ती मार्गे बल्लापूर वळविण्यात आली आहे.
कोरपना तालुक्यात पेंनगंगा नदीच्यापाण्यात प्रचंड वाढ झाल्याने कोरपना ते कोढसी रस्ता बंद झाला आहे. कोढसी खु. ते कोढसी बू. रस्ता बंद झाला आहे. भोयगाव-धानोरा मार्ग व भारोसा इरई मार्ग बंद झाले आहेत. सावली तालुक्यात मौजा केरोडा कडून जाम बुज कडे जाणारा मार्ग मुसळधार पावसामुळे नाल्यावर पाणी वाहत असल्याने बंद झाला आहे. जिबगाव ते सावली आणि जिबगाव ते सिर्सी मार्ग बंद झाला आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही काही ठिकाणी लहान मोठे मार्ग बंद झाल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी आवश्यक कारणाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांत मुसळधार पावसाने जोर धरला असून सरासरी 68 मि.मी. पर्जन्यमान नांदविण्यात आले आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी मोठ्य प्रमाणावर पाऊस झाला तर काही तालुक्यात तुलनेने कमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस ब्रम्हपुरी तालुक्यात 148.5 मि.मी. नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर नागभीड तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाचा पत्ता नव्हता. चौवीस तासात पावसाने झोडपुन काढल्याने 99.4 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ सावली, मुल, चिमूर, पोंभूर्णा तालुक्याला पावसाने झोडपले आहे. तर सर्वात पाऊस वरोरा तालुक्यात पडला असून 20.6 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सध्या स्थितीमध्ये कुठेही जिवितहाणीच्या घटना नाही. मालमत्तेचे (घरांचे) नुकसान नाही. जिल्हा व तालुकाप्रशासन पुरस्थितीवर लक्ष केंद्रीत करून आहे.
चंद्रपूर : 56.9 मि.मी., मूल : 82.1 मि.मी., गोंडपिपरी : 38.3 मि.मी., वरोरा : 20.6 मि.मी., भद्रावती : 41.0मि.मी.,चिमूर : 72.0 मि.मी.,ब्रम्हपुरी : 148.5 मि.मी., नागभिड : 99.4 मि.मी.,सिंदेवाही : 61.7 मि.मी., राजुरा : 39.3 मि.मी., कोरपना : 65.0 मि.मी., सावली : 97.2 मि.मी., बल्लारपूर :42.8 मि.मी., पोंभुर्णा : 70.4 मि.मी., जिवती : 60.9 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची एकूण सरासरी 68.0 मि.मी. पर्जन्यमान नोंदवले गेले आहे.