Chandrapur News | गोंडपिपरीत ओव्हरलोड वाहतूक; खड्डेमय रस्त्यांवरून जीवघेणा प्रवास

अवैध रेती वाहतूक आणि अवजड वाहनांमुळे ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांत झाडे लावून ग्रामस्थांचे आंदोलन
Gondpipri Overload Transport
अवजड वाहनांमुळे ग्रामीण रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. Pudhari
Published on: 
Updated on: 

Gondpipri Overload Transport

चंद्रपूर : गोंडपिपरी आणि राजुरा तालुक्यात अवैध रेती वाहतूक तसेच क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे ग्रामीण रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार तक्रारी आणि आंदोलने करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे.

कोठारी ते वेडगाव, विरूर ते वरूर, आर्वी ते वरूर, धानोरा ते विहीरगाव, अमृतगुडा ते चुनाळा आणि वरूर ते खामोणा या मार्गांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे चुकविताना अपघाताचा धोका निर्माण होत आहे. तोहगाव येथील ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांत झाडे लावून अनोखे आंदोलन केले होते. यापूर्वी अवजड वाहतूक रोखूनही निषेध नोंदविण्यात आला. मात्र, ठोस उपाययोजना झालेली नाही.

Gondpipri Overload Transport
Chandrapur news: बुटांच्या खुणा, संशयास्पद कार अन् गुप्त माहिती; अखेर वरोऱ्यातील घरफोडीचा पर्दाफाश; ३० लाखांचा ऐवज जप्त

गोंडपिपरीतील आर्वी तसेच राजुरा तालुक्यातील कवितपेठ आणि चिंचोली येथील रेती घाटांमधून वाहतुकीसोबतच परिसरात अनधिकृत घाटांवरूनही रात्रीच्या वेळी रेतीची वाहतूक होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. याशिवाय सूरजागड येथून येणारी अवजड वाहने कोठारी मार्गे ग्रामीण भागातून जात असल्याने रस्त्यांवरील ताण वाढला आहे.

तेलंगणा सीमेलगतच्या भागातूनही अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अवैध रेती वाहतूक रोखणे, ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करणे आणि खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. महसूल, खनिकर्म, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.