

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची पातळी इतकी खाली गेली आहे की आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागली आहे. जनता कॉलेज चौकातील सेव्हन स्टार बेकरीसमोर महापालिकेने नुकतेच नालीवर चेंबर बांधले होते. परंतु या चेंबरचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे काल उघडकीस आले. चेंबर अचानक कोसळल्याने एक व्यक्ती थेट नालीत कोसळला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, पण या घटनेने महापालिकेच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. निकृष्ट बांधकामाबाबत महानगर पालिकेवर प्रचंड टिका केली जात आहे.
दोन दिवसांपूर्वी जनता कॉलेज चौकातील सेव्हन स्टार बेकरीसमोर स्कुटीने दोन व्यकती आले. बेकरीसमोर वाहन लावून सामान घेण्यासाठी आत मध्ये जात असताना एकाने नालीवरील चेंबरवर पाय ठेवला. चेंबर क्षणात तुटून खाली पडला. त्यासोबच सदर व्यक्तीही संतुलन सुटल्याने तो थेट नालीत पडला. घटनेच्या वेळी त्याच्या सोबत असलेल्या सहकाऱ्याने तत्काळ त्याला बाहेर काढले.
प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा गंभीर अपघाताला समोरे जावे लागले असते. बेकरीमधील सिसिटीव्ही मधील कॅमेरे मध्ये हा सर्व प्रकार कैद झाला. सध्या या अपघाताचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. शिवाय काहींनी स्टेटस ठेवून महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारावर चांगलीच झोड उठविली आहे.
महानगरपालिकेने नुकतेच केलेले हे चेंबर बांधकाम असून इतक्या कमी कालावधीत त्याची अशी दुरवस्था झाली हे धक्कादायक आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, महापालिकेच्या कामांमध्ये सातत्याने भ्रष्टाचार व हलगर्जीपणा होत असून याचा थेट परिणाम नागरिकांच्या सुरक्षिततेवर होत आहे. "साध्या नालीचे चेंबर टिकत नसतील तर मोठ्या कामांचे काय?" असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. चेंबर कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात पडून कोणी जीव गमावला असता तर जबाबदार कोण ? निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका घेणार का? असे प्रश्न नागरिक विचारत आहेत.
महानगरपालिकेने तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.