

चंद्रपूर : एलएलबीच्या परीक्षेत सलग चार वर्षे अपयशी ठरल्यानंतर स्वतःचीच बनावट एलएलबी पदवी आणि गुणपत्रिका तयार करून बार कौन्सिलची सनद मिळवली आणि थेट उच्च न्यायालयात वकिली सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरातील बनावट पदवी-गुणपत्रिका रॅकेटच्या तपासातून समोर आला.
या प्रकरणातील कथित मास्टरमाइंड परिमल गौरकर याच्याबाबत पोलिस तपासात ही माहिती पुढे आली. दरम्यान, ग्राहकांच्या मागणीनुसार देशातील विविध विद्यापीठांच्या बनावट पदव्या आणि गुणपत्रिका तयार करून त्यासाठी पाच ते दहा लाख रुपये घेतले जात असल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
चंद्रपूर येथील वैभव माशीरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुर्गापूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी वैभव सोनुले आणि त्याचे साथीदार बनावट पदवी घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांचा शोध घेत त्यांना परिमल गौरकर याच्याकडे पाठवत असल्याचे समोर आले.
या रॅकेटमध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार विविध विद्यापीठांच्या नावाने बनावट पदव्या, गुणपत्रिका आणि अन्य शैक्षणिक प्रमाणपत्रे तयार केली जात असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. नागपूर विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ यांच्यासह कोल्हापूर, सोलापूर तसेच कर्नाटक आणि राजस्थानमधील विविध विद्यापीठांच्या नावाने कागदपत्रे तयार करून दिली जात होती.
विशिष्ट अभ्यासक्रमाची पदवी, एखाद्या विद्यापीठाची गुणपत्रिका किंवा विशिष्ट शैक्षणिक प्रमाणपत्र हवे असल्यास ग्राहकाच्या मागणीनुसार त्याची बनावट कागदपत्रे तयार केली जात होती. या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पाच ते दहा लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले आहे.
या बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांचा वापर करून काही व्यक्तींनी सरकारी अथवा अन्य नोकऱ्या मिळवल्या असाव्यात, तसेच पदोन्नती घेतली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तपासाची व्याप्ती आता केवळ बनावट प्रमाणपत्रे तयार करणाऱ्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. या प्रमाणपत्रांचा वापर करणाऱ्या व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे. बनावट पदवीच्या आधारे कोणी नोकरी मिळवली का, कोणाला पदोन्नती मिळाली, किती जणांनी अशा प्रमाणपत्रांचा वापर केला आणि या व्यवहारामागे नेमकी किती आर्थिक उलाढाल झाली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे कथित मास्टरमाइंड परिमल गौरकर याच्याबाबत समोर आलेली माहिती. परिमल हा एलएलबीचा विद्यार्थी होता. मात्र, सलग चार वर्षे एलएलबीच्या परीक्षेत अपयशी ठरल्यानंतर त्याने स्वतःचीच बनावट एलएलबी पदवी आणि गुणपत्रिका तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने बार कौन्सिलची सनद मिळवली आणि त्यानंतर उच्च न्यायालयात वकिली सुरू केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांचे हे रॅकेट थेट न्यायालयीन व्यवसायापर्यंत पोहोचल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
पोलिसांनी या प्रकरणातील कागदपत्रांची संबंधित विद्यापीठे तसेच बार कौन्सिलकडून पडताळणी सुरू केली आहे. परिमल गौरकर याची एलएलबी पदवी अधिकृतरीत्या जारी झाली होती का, संबंधित विद्यापीठाच्या नोंदींमध्ये त्याचे नाव आहे का, तसेच इतर बनावट प्रमाणपत्रांमधील माहिती खरी आहे का, याची पडताळणी केली जात आहे. या प्रमाणपत्रांच्या आधारे संबंधित व्यक्तींनी कुठे आणि कोणते लाभ घेतले, याची माहितीही पोलिसांकडून गोळा केली जात आहे.
तपासात महाराष्ट्रासह कर्नाटक आणि राजस्थानमधील विद्यापीठांची नावे समोर आल्याने या रॅकेटची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बनावट पदव्या तयार करणारे, ग्राहक शोधणारे, ग्राहकांशी संपर्क साधणारे, कागदपत्रांचा वापर करणारे आणि आर्थिक व्यवहार करणारे आणखी किती जण या साखळीत सहभागी आहेत, याचा शोध दुर्गापूर पोलिस घेत आहेत. बनावट पदव्यांच्या आधारे किती जणांनी नोकऱ्या मिळवल्या, किती जणांना पदोन्नती मिळाली आणि या संपूर्ण रॅकेटमध्ये किती कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली, हे तपासातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पुढील तपासात या रॅकेटची आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.