

चंद्रपूर : मानवी नात्यांमध्ये काही बंध असे असतात, जे मृत्यूच्याही पलीकडे जातात. कोरपना शहरात घडलेली एक हृदयस्पर्शी घटना याच भावनेची साक्ष देऊन गेली आहे. वयोवृद्ध पतीच्या निधनानंतर केवळ चार दिवसांत पत्नीनेही देह ठेवला. “जन्मोजन्माची साथ” ही म्हण या घटनेत अक्षरशः उतरली.
कोरपना येथील सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व नामदेव झाडे (वय ८०) यांचे रविवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचा सुस्वभाव, प्रेमळ वर्तणूक आणि सामाजिक जिव्हाळा यामुळे ते शहरात सर्वांचे लाडके होते. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण झाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. परिसरात शोककळा पसरली.
परंतु नियतीने आणखी एक धक्का दिला — पतीच्या विरहाचे दुःख सहन न झाल्याने त्यांच्या पत्नी सुभद्रा नामदेव झाडे यांनीही गुरुवारी प्राण सोडले. केवळ चार दिवसांच्या अंतराने या दांपत्याची “अखेरची साथ” कायमची ठरली. आयुष्यभर एकमेकांच्या सुख-दुःखात साथ देणाऱ्या या दांपत्याने मृत्यूनंतरही एकत्र प्रवास केला.
दोघांचेही अंत्यसंस्कार कोरपना येथील स्मशानभूमीत मोठ्या उपस्थितीत पार पडले. नातेवाईक, नागरिक आणि परिचित डोळ्यांत अश्रू घेऊन या दांपत्याला शेवटचा निरोप देत होते. संपूर्ण शहरात या घटनेने भावनिक वातावरण निर्माण झाले असून, सर्वत्र “खऱ्या अर्थाने जन्मोजन्माची साथ निभावली” अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.