चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूरच्या तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना अनियमिततेसाठी दोषी ठरवित शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव यांनी सोमवारी ( दि. 26) निलंबित केले आहे. सध्या त्या जळगाव येथे जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत आहेत. (Chandrapur News)
कल्पना चव्हाण यांना त्यांच्या कार्यकाळात केलेल्या अनियमिततेची चौकशी करून तत्काळ निलंबित करावे. त्यांच्या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली होती. आठवडाभरात त्यांचा खुलासा प्राप्त होताच निलंबित करू, असे स्पष्ट उत्तर सभागृहात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते. (Chandrapur News)
नागपूर विभागाचे विभागीय उपसंचालक यांनी कल्पना चव्हाण यांच्या विरोधात प्राप्त झालेल्या तक्रारींची प्रारंभिक प्राथमिक चौकशी तपासणी केली असता त्यांच्याकडून अनियमितता झाल्याचे आढळून आले. त्यानंतर आयुक्त (शिक्षण) पुणे यांनी चव्हाण यांना शासन सेवेतून निलंबित करण्याची शिफारस केली होती.
त्यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव यांनी कल्पना चव्हाण यांना शासन सेवेतून निलंबित करण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे शालेय शिक्षण विभागातील अधिकारी वर्गांत खळबळ उडाली आहे. शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात हलगर्जीपणा व अनियमितता करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांची यापुढेही गय केली जाणार नसल्याचे आमदार अडबाले यांनी सांगितले. (Chandrapur News)