

चंद्रपूर : महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम १९६६ मधील नियम १७ (१) (ब) नुसार आवश्यक कार्यवाही न झाल्यामुळे स्थगित करण्यात आलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील स्थगित निवडणुकीसाठी शनिवारी (दि.२०) मतदान होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या २९ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशान्वये सुधारित निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील काही नगर परिषद व नगर पंचायतांमधील अध्यक्ष व सदस्य पदांसाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.
या निवडणुकीत घुग्घुस नगर परिषद – अध्यक्ष व सर्व सदस्य, गडचांदूर नगर परिषद – जागा क्र. ८-ब (सर्वसाधारण – महिला), मूल नगर परिषद – जागा क्र. १०-ब (सर्वसाधारण), बल्लारपूर नगर परिषद – जागा क्र. ९-अ (ना.मा.प्र.), वरोरा नगर परिषद – जागा क्र. ७-ब (सर्वसाधारण) या जागांसाठी उद्या मतदान होत आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिस विभागाने नागरिकांना शांततेत व निर्भय वातावरणात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
पोलिस विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, EVM व VVPAT यंत्रणा तसेच इतर मतदान साहित्याचे नुकसान करणे, मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे किंवा गैरवर्तन करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकरणांमध्ये तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
मतदान केंद्रांवर शिस्त पाळणे, निवडणूक कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे, अफवा पसरवू नये तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, नागरिकांनी निर्भयपणे मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन चंद्रपूर पोलिस विभाग व निवडणूक प्रशासनाने केले आहे.