

Chindhichak Ashram School
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील शासकीय योजनांची अंमलबजावणी, दर्जा व प्रगती तपासण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी विविध प्रकल्पांना भेट दिली. यामध्ये चिंधीचक येथील मुलींच्या शासकीय आश्रमशाळेच्या भेटीला विशेष महत्त्व असून, त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षण, भोजन व निवासी सुविधांची सखोल पाहणी केली.
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी नुकत्याच केलेल्या नागभीड तालुक्यातील दौऱ्यात चिंधीचक येथील मुलींच्या शासकीय आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थिनींच्या शैक्षणिक व निवासी स्थितीची तपासणी केली.
सदर आश्रमशाळेची नवी इमारत जवळपास पूर्णत्वास आली असून, ती लवकरात लवकर हस्तांतरण करून विद्यार्थ्यांच्या सेवेस उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शाळा भेटीदरम्यान जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी थेट वर्गात जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. अभ्यासक्रम, शिक्षकांची उपस्थिती, अभ्यासाचे तास, शैक्षणिक साहित्य व इतर मूलभूत गोष्टींबाबत माहिती घेतली. त्यांनी विद्यार्थिनींच्या उत्तरांमधून शिक्षणाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले.
याशिवाय, त्यांनी भोजनगृहाची पाहणी करून भोजनाचा दर्जा व स्वच्छता यावर विशेष भर दिला. मुलींना सकस व पोषणमूल्ययुक्त आहार मिळावा यासाठी अन्न प्रक्रियेसंबंधित मार्गदर्शनही केले. आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थिनींनी अभ्यासासोबतच आरोग्य, स्वच्छता व संस्कारक्षम वातावरणात राहावे यावर जिल्हाधिकाऱ्यांनी भर दिला. जिल्हाधिकार्यांच्या या भेटीमुळे चिंधीचक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दौर्यात जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी तळोधी येथील अंगणवाडी, कचरा विलगीकरण केंद्र, पळसगाव खुर्द येथील तलाठी कार्यालय बांधकाम, नवेगाव पांडव येथील स्मार्ट पीएचसी, गांडूळ खत प्रकल्प, तसेच नवखळा सौर ऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा प्रकल्प यांना भेट देत कामाची पाहणी केली.प्रत्येक ठिकाणी त्यांनी कार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत व दर्जेदार काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
या भेटीदरम्यान उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसीलदार प्रताप वाघमारे, गटविकास अधिकारी स्नेहल लाड, बालविकास प्रकल्प अधिकारी शिला गेडाम, मुख्याधिकारी सोनम देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, डॉ. आखाडे यांच्यासह स्थानिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.