

Chimur Police Station
चंद्रपूर : शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर समाजाशी नातं जोडणारा अनुभव असतो, याचा प्रत्यय चिमूर तालुक्यातील राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालय, वडाळा (पैकू) येथील मूकबधिर विद्यार्थ्यांनी आपल्या प्रेरणादायी शैक्षणिक सहलीतून दिला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकासाच्या उद्देशाने आयोजित ही सहल उत्साहपूर्ण व समाजभान जागवणारी ठरली.
सहलीच्या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशन, चिमूर येथे भेट दिली. येथे तक्रार नोंदणी प्रक्रिया, सायबर गुन्हे विभागाचे कार्य, शस्त्रागार, तुरुंग व्यवस्था तसेच पोलिसांच्या जबाबदाऱ्या यांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून देण्यात आली. विशेष म्हणजे मूकबधिर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य व पथनाट्याद्वारे सोशल मीडियाच्या अतिवापराचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांचा प्रभावी संदेश देण्यात आला.
ठाणेदार दिनेश लबडे व एस.डी.पी.ओ. दिनकर ठोसर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने अधिकारी व कर्मचारी भावूक झाले. यावेळी लहान विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला, ज्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासाला नवे बळ मिळाले.
यानंतर विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गरडापार येथे भेट दिली. या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शाळेची शैक्षणिक पद्धत, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, आधुनिक शैक्षणिक साधने व भौतिक सुविधांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. सामान्य विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना मूकबधिर विद्यार्थ्यांनी सामाजिक समावेशन, समानता आणि आपुलकीचा अनुभव प्रत्यक्षात अनुभवला.
सहलीचा पुढील टप्पा दिव्य वंदना आधार फाउंडेशन, पुनर्वसन केंद्र, जामगाव (कोमटी) येथे पार पडला. येथे मनोरुग्ण, बेघर व उपेक्षित घटकांनी सादर केलेल्या कला सादरीकरणाने विद्यार्थ्यांच्या मनात करुणा व सहानुभूतीची भावना जागी झाली. यावेळी मूकबधिर व सामान्य शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत नृत्य व गीतांच्या माध्यमातून बहुरंगी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून एकतेचा संदेश दिला.
या प्रसंगी मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास कामडी व गरडापार शाळेच्या शिक्षिका कल्पना महाकारकर यांचा संस्थापक अध्यक्ष श्री. शुभम प्रसारकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या शैक्षणिक सहलीतून विद्यार्थ्यांना केवळ माहितीच नव्हे, तर शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक भान, नैतिक मूल्ये, करुणा, सहानुभूती आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे जिवंत धडे मिळाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व किती मोठे आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. ही सहल यशस्वी होण्यासाठी मूकबधिर विद्यालय व जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.