

चंद्रपूर : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू, गुटखा आणि पानमसाल्याच्या अवैध विक्री व साठवणुकीविरोधात चंद्रपूर पोलिसांनी सुरू केलेली धडक मोहीम कायम आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) राजुरा उपविभागीय पथकाने कोठारी पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ९८ हजार ९३९ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व पानमसाला जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २० मे २०२६ रोजी कोठारी परिसरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची साठवणूक करून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने संशयिताच्या घर व दुकानावर अचानक छापा टाकला. छाप्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या सात वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचा सुगंधित तंबाखू, गुटखा आणि पानमसाला असा एकूण ९८ हजार ९३९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी बंडू रामदास पहानपट्टे (वय ५३) रा. कोठारी, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन कोठारी येथे अप. क्र. १०४/२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत सपोनि श्री. बलराम झाडोकार, पोउपनि श्री. सर्वेश बेलसरे, पोहवा अजय बागेसर, किशोर वैरागडे तसेच पोअं गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर आणि वृषभ बारसिंगे यांनी सहभाग घेतला.