

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेच्या घडामोडींना नवे वळण मिळाले असून, काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या भेटीत काँग्रेसला साथ देण्याची विनंती करण्यात आली असून, महापौर पद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचा तिढा दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचा होत असताना, आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुंबई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीत चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली असून, सत्ता स्थापनेसाठी संभाव्य राजकीय समन्वयाबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
चर्चेदरम्यान काँग्रेस आणि उबाठा गट यांच्यात महापौर पद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याचा फॉर्म्युला चर्चेत आल्याचे समजते. तसेच स्थायी समितीचे पदही दोन्ही पक्षांमध्ये वाटून घेण्याबाबत सहमती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, महापौर पदासाठी प्रथम संधी कोणाला मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उबाठा गटाशी समन्वय साधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू असताना, खासदार प्रतिभा धानोरकर यांची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या गटाकडे असलेल्या नगरसेवकांची भूमिका काय राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. वडेट्टीवार–ठाकरे भेटीनंतर धानोरकर गट कोणती भूमिका घेतो, हे निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे भाजप अद्याप महापौर पदासाठी आशावादी असून, “काँग्रेसचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत,” असा दावा सातत्याने केला जात आहे. मात्र आज वडेट्टीवार–ठाकरे भेटीत झालेल्या चर्चेनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा फॉर्म्युला आकार घेत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेत काँग्रेस–उबाठा समन्वयाची शक्यता वाढली असून, आगामी काही तासांत किंवा दिवसांत सत्तासमीकरण स्पष्ट होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.