

Chimur Poster Protest
चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर चिमूर शहरातील एका आंबेडकरप्रेमी युवकाने मत विकणाऱ्या नागरिकांना थेट सवाल करत लोकशाहीचे खरे मूल्य अधोरेखित केले आहे. “500 व 1000 रुपयांत मत विकणाऱ्यांनी 6 डिसेंबरला अश्रू ढाळण्याचे सोंग करू नये” अशा बोचऱ्या आशयाचे पोस्टर शहरातील आंबेडकर चौकात लावून युवक चंदन राऊत यांनी मतदारांना आत्मपरीक्षणाचा ठाम संदेश दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच संपलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटप आणि मत खरेदी झाली, अशी चर्चा जनमानसात सुरू असताना चिमूर येथील चंदन राऊत या तरुणाने मतदान संस्कृतीतील बिघाडावर धडक प्रहार केला आहे. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या दिवशी बाबासाहेबांना लाखो अनुयायी श्रद्धांजली अर्पण करतात. त्याच दिवशी लोकशाहीची पायाभरणी करणाऱ्या मतदान प्रक्रियेचा अवमान करणाऱ्या नागरिकांना चपराक देणारा संदेश राऊत यांनी दिला.
“500 व 1000 रुपयांत मत विकणाऱ्यांनी 6 डिसेंबरला रडण्याचे सोंग करू नये” असे पोस्टर त्यांनी आंबेडकर चौकात लावले. या पोस्टरमुळे शहरात चर्चेचा विषय निर्माण झाला असून मोठ्या संख्येने नागरिकांचे लक्ष त्याकडे वेधले गेले.
राऊत यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, पैशाच्या मोबदल्यात मत विकण्याची प्रवृत्ती ही लोकशाहीच्या मुळांना पोखरणारी आहे. बाबासाहेबांनी ज्या संविधानिक व सामाजिक मूल्यांसाठी आयुष्य घालवले, त्यांची पायमल्ली पैसे घेऊन मतदान करणारा नागरिक आणि पैसे देऊन मत विकत घेणारा नेता दोघेही करतात, असा ठाम निषेध त्यांनी नोंदवला.
त्यांच्या मते, बाबासाहेबांच्या विचारांवरील प्रेम हे केवळ 6 डिसेंबरच्या कार्यक्रमांपुरते मर्यादित असू नये; ते मतदान पेटीतून सिद्ध झाले पाहिजे. महापरिनिर्वाण दिन हा फक्त पुष्पचक्र अर्पण करण्याचा दिवस नसून लोकशाही मजबूत करण्याची प्रतिज्ञा करण्याचा दिवस असल्याचे आवर्जून अधोरेखित करण्यात आले.
डॉ. आंबेडकर चौकात लावलेले हे ठळक व सचोटीतून मांडलेले पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. अनेकांनी युवक चंदन राऊत यांच्या या धाडसी उपक्रमाचे कौतुक केले असून राजकीय नैतिकतेच्या प्रश्नावर त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा नागरिकांना विचार करायला लावणारा असल्याचे नमूद केले आहे. चिमूर शहरातील हा अनोखा उपक्रम लोकशाहीतील सजगतेचा संदेश देणारा ठरला असून, युवकांच्या या पुढाकाराने नागरिकांमध्ये मतदान संस्कृतीबाबत सकारात्मक जाणीव निर्माण झाली आहे.