

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
आज सकाळी नेहमीप्रमाणे गाई, म्हशी चारण्यासाठी जंगलात घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली. सुखराम इडपाची असे वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प संरक्षित वनक्षेत्रातील तुयापार जामुनिया गावानजीक ही घटना घडली.
काहींच्या मते तो रात्री शेतात गेला पण परतला नाही. 2020 पासून आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात जवळपास 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी रामटेक तालुक्यातील कन्हान परिसरात एका पट्टेदार वाघाचा धान पीक शेतात मृत्यू झाल्याची घटना घडली. गेल्या काही दिवसात नागपूर जिल्ह्यातही वाघाचे दर्शन व या सोबतच वाघाचा हल्ला असे प्रकार वाढले असून रात्रीच्या वेळेस शेतात जागलीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.