

Bhadurli Mul road tunnel water bus stuck
चंद्रपूर : भादुर्ली–मुल मार्गावर (MH40 N 9426) या क्रमांकाची बस पाण्यात अडकल्याने सर्वांची तारांबळ उडाली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविल्या जात आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.
चंद्रपूर विभागात शुक्रवारी सायंकाळी सव्वासाहाच्या सुमारास भादुर्ली ते मुल या मार्गावर चालणारी चंद्रपूर आगाराची बस (क्रमांक MH40 N 9426) बोगद्याखाली साचलेल्या पाण्यात अडकून पडल्याची घटना समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे पटरीखालील बोगद्यामध्ये एक ते दोन फूट पाणी जमा झाले होते. तरीही बस चालकाने गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु सायलेन्सरला पाणी लागल्याने बस बंद पडली. त्यानंतर पाऊस वाढल्याने पाणी मोठ्या प्रमाणात साचून गाडीच्या रेडिएटर पर्यंत पोहोचले आणि बस अडकून राहिली.
घटनेच्या वेळी बसमध्ये तीन प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि प्रवासी, चालक व वाहक सुखरूप असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. घटनेच्या प्राथमिक चौकशीत चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी चंद्रपूर आगाराचे व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी, सहाय्यक यंत्र अभियंता तसेच यांत्रिक कर्मचारी उपस्थित राहून बस बाहेर काढण्याचे काम करत आहेत.