Chandrapur Liquor Seized | भद्रावती पोलिसांची धडक कारवाई; विदेशी दारूसाठा, कारसह ८.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाकाबंदीवेळी पोलिसांचा पाठलाग चुकवून चालक फरार; महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल
Bhadrawati Police Action
३.३६ लाखांचा विदेशी दारूसाठा आणि ५ लाख किंमतीची कार जप्त केली Pudhari
Published on
Updated on

Bhadrawati Police Action

चंद्रपूर : भद्रावती पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे गुरुवारी (दि. ३०) पहाटे राबविलेल्या धडक कारवाईत ३.३६ लाखांचा विदेशी दारूसाठा आणि ५ लाख किंमतीची कार असा एकूण ८.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांचा पाठलाग सुरू असताना चालकाने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले असून त्याचा शोध सुरू आहे.

नागपूरहून चंद्रपूरच्या दिशेने मारुती सुझुकी स्विफ्ट ZDI (एमएच-०४-एचएफ-१२०८) या कारमधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी पहाटे ५ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास भद्रावती टप्पा येथे नाकाबंदी करण्यात आली.

Bhadrawati Police Action
Chandrapur news : आदिवासी विद्यार्थ्यांनी तयार केले २ लाख सीडबॉल!

नाकाबंदीदरम्यान संशयित स्विफ्ट कार दिसताच चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने चंद्रपूरच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी तातडीने पाठलाग सुरू केला. पाठलागादरम्यान चालकाने वाहन मौजा घोडपेठ गावातील वस्तीच्या दिशेने वळविले. काही अंतरानंतर वाहन नजरेआड झाल्याने पोलिसांनी परिसरात शोधमोहीम हाती घेतली.

शोधादरम्यान घोडपेठ येथील शंकर हेअर सलूनसमोर संशयित स्विफ्ट कार बेवारस अवस्थेत आढळून आली. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये ऑफिसर चॉईस विदेशी दारूच्या १८० मि.ली.च्या १,७२८ निप्पा (किंमत २,९५,४८८) तसेच ९० मि.ली.च्या ४८० निप्पा (किंमत ४१,२८०) असा एकूण ३,३६,७६८ किमतीचा विदेशी दारूसाठा आढळून आला. याशिवाय ५ लाख किमतीची स्विफ्ट कारही जप्त करण्यात आली. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ८,३६,७६८ किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

Bhadrawati Police Action
Chandrapur news: एकाच दिवशी दोन टोकाचे प्रसंग! रेल्वेखाली अस्वलीचा मृत्यू; लोकोपायलटच्या प्रसंगावधानाने वाघाचा जीव वाचला

या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७१०/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. ही कारवाई  पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, गजानन तुपकर तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news