

चंद्रपूर : ब्रम्हपुरी वनविभागात वनविश्रामगृहात वाघाने हल्ला करून एका इसमाची हत्या झाल्याचा दावा करत सोशल मीडियावर व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आला. मात्र वनविभागाने हा व्हिडीओ पूर्णपणे बनावट असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तयार केलेला असल्याचे स्पष्ट केले आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांनी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी येथे सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या एका व्हिडीओमुळे ब्रम्हपुरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हिडीओमध्ये ब्रम्हपुरी येथील वनविश्रामगृहात वाघाच्या हल्ल्यात एकाची इसमाची हत्या झाल्याचे दृश्य दाखविण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये ही घटना दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी १८.४२ वाजता घडल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र चंद्रपूर वनवृत्तातील ब्रम्हपुरी वनविभागाने हा दावा फेटाळून लावत स्पष्ट केले आहे की वनविभागात अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही.
मुख्य वनसंरक्षक (प्रा.) आर. एम. रामानुजम यांनी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये सांगितले की, अलीकडे मानव-वन्यजीव संघर्षाच्या काही घटना घडल्या असल्या तरी काही समाजकंटकांनी याचाच गैरफायदा घेत जनतेमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. वनविभागाने अशा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. व्हिडीओ तयार करणारे, पोस्ट करणारे आणि पुढे शेअर करणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वनविभागाने स्पष्ट केले आहे की, बनावट माहिती किंवा व्हिडीओ प्रसारित करणे हे सायबर गुन्हा आहे आणि त्यासाठी संबंधित व्यक्तींना कायद्यानुसार शिक्षा भोगावी लागू शकते. जनतेला पुन्हा आवाहन करण्यात आले आहे की, अशा प्रकारच्या बनावट व्हिडीओंवर विश्वास ठेवू नये,
सोशल मीडियावर अफवा पुढे शेअर करू नयेत, संशयास्पद माहिती आढळल्यास जवळच्या वनविभाग किंवा पोलिसांना कळवावे. "व्हिडीओ पूर्णपणे खोटा असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence - AI) साहाय्याने तयार करण्यात आला आहे. नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा आणि दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे."
: आर. एम. रामानुजम, मुख्य वनसंरक्षक,चंद्रपूर