

चंद्रपूर: चिमूर तालुक्यातील शंकरपूर-आंबोली मार्गावरील ठाणारीठ परिसरातील शेतात कापूस वेचत असताना शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना बुधवारी (५ नोव्हेंबर) रात्री ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ईश्वर भरडे (५२ वर्षे) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
रात्री उशिरापर्यंत संतप्त नागरिकांनी शंकरपूर-आंबोली मार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ठाणारीठ परिसरातील शेतात मृतक ईश्वर भरडे दुपारी १२ वाजता शेतातील कापूस वेचण्यासाठी गेले होते. सायंकाळ झाल्यानंतरही घरी परत आले नसल्याने कुटुंबीयांसह काही नागरिकांनी शेताकडे धाव घेतली. यावेळी शेताजवळ त्यांची सायकल दिसून आली. त्यानंतर शेतातच त्यांचा मृतदेह आढळून आला. दुपारच्या सुमारास त्याला वाघाने त्याला ठार केले असावे असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.
वाघाने हल्ला करून ठार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. रात्री उशिरापर्यंत शंकरपूर-आंबोली मार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन करून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी रेटून धरण्यात आली. गेल्या महिनाभरात शंकरपूर परिसरात वाघाच्या हल्ल्याची तिसरी घटना असून, वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केल्यानंतरही वनविभागाकडून उपाययोजना होत नसल्याने नागरिक चांगलेच संतप्त झाले आहे. रात्री बराचवेळ आंदोलन सुरूच होते.