

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील भेडाळा (भेडाळा) येथील 55 वर्षीय इसमाचा तनस भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवरून खाली पडून डोक्याला गंभीर मार लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नेरीजवळील शिवमंदिर परिसरात उघडकीस आली. ही घटना आज सोमवारी (29 डिसेंबर) रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडली असावी, असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर नेरी पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला.
मृतक शंकर रामभाऊ बन्सोड (वय 55) रा. भेडाळा, ता. सिंदेवाही हे आपल्या ट्रॅक्टरने तनस भरून मौजा कोरा (ता. समुद्रपूर) येथील नातेवाईकांकडे पोहोचविण्यासाठी जात होते. प्रवासादरम्यान ते नेरीजवळील शिवमंदिराजवळ आले असता, ट्रॅक्टर-ट्रॉलीवरील तनसाच्या ढिगाऱ्यावर बसलेले शंकर बन्सोड हे घसरून (स्लिप होऊन) खाली पडले. रस्ता सिमेंट काँक्रीटचा असल्याने डोक्याला जबर मार लागला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ट्रॅक्टर त्यांचा मुलगा चंद्रशेखर बन्सोड चालवत होता. मात्र, वडील ट्रॉलीवरून खाली पडल्याची त्याला कोणतीही कल्पना नव्हती. तो ट्रॅक्टर थेट कोरा येथे घेऊन गेला. पोहोचल्यावर त्याने “बाबा, खाली उतरा… आपण पोहोचलो” असा आवाज दिला. मात्र वारंवार हाक देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने त्याला वडील वाटेत पडले असावेत, असा संशय आला.
यानंतर त्याने तात्काळ ट्रॉलीतील तनस खाली उतरवला आणि रस्त्याने परत शोध सुरू केला. चौकशी करत नेरीकडे येईपर्यंत पहाटेचे 5 वाजले होते. दरम्यान, शिवमंदिराजवळ वडील रस्त्याकडेला मृतावस्थेत पडलेले त्याला दिसून आला. नेरीचे तामुस (तमुस) अध्यक्ष पिंटू खाटीक यांनी तात्काळ नेरी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच API अमोल बारापात्रे व मेजर चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतकाचा पंचनामा केला. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला.
या घटनेने नेरी, चिमूर, सिंदेवाही परिसरात शोककळा पसरली असून, रात्रीच्या प्रवासात ट्रॉलीवर बसून वाहतूक करणे किती धोकादायक ठरू शकते याची पुन्हा एकदा जाणीव या घटनेने करून दिली आहे.