

16th National Voters Day Maharashtra
चंद्रपूर : भारतीय स्वातंत्र्यापासूनच आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला आहे. आपल्या लोकशाहीची मूल्ये बालपणापासूनच आपल्या मनामध्ये रुजली पाहिजे. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भवितव्य ठरविणार आहे, त्यामुळेच राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विद्यार्थ्यांना येथे आमंत्रित करण्यात आले आहे. 17 व्या वर्षी आपण मतदार नोंदणी करू शकतो व 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मतदानासाठी पात्र ठरतो. कारण मतदान प्रक्रियेत सहभागी होणे हे लोकशाहीचे पहिले मुल्य आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले.
25 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी आल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने 23 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदान दिन साजरा करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. व्यवहारे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शुभम दांडेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, तहसीलदार (सामान्य्) प्रिया कवळे आदी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार म्हणाले, संपूर्ण भारतात आज राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येत आहे. निवडणुकांमध्ये मतदार हा सर्वात महत्वाचा असल्यामुळे मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे. भारतात प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार दिला आहे. मतदान न करणे अतिशय दुर्देवी असून मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे हे आपले कर्तव्य आहे. आता वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करता येते.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी शुभम दांडेकर म्हणाले, निवडणुका ह्या लोकशाहीचा अविभाज्य घटक आहे. मुक्त आणि नि:पक्ष वातावरणात पारदर्शकपणे निवडणुका घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आहे. संविधान सभेत ‘मतदानाचा सार्वत्रिक अधिकार’ या कलमावर सर्वांचेच एकमत झाले होते. त्यामुळे देशाच्या उज्वल भविष्यासाठी मतदार नोंदणी करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थितांना मतदार दिनाची शपथ देण्यात आली.
नवमतदारांना ओळखपत्राचे वाटप
वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या नवीन मतदारांना मान्यवरांच्या हस्ते मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. यात रविना नाले, मनाली राऊत, कोमल सातरे, भुमिका घाटोळे, नयन घाटोळे, आरुषी डोईजड यांचा समावेश होता.
मतदान प्रक्रियेत उत्कृष्ट काम करणा-या बीएलओ / पर्यवेक्षकांचा सत्कार करण्यात आला. यात निलेश चु-हे, विभा सहारे, बंटी बिरीया, सुरेश गौरकार, प्रकाश होळंबे, विजय खनके यांचा समावेश होता.