

चंद्रपूर: राज्यात उष्णतेची तीव्र लाट पसरत असून, विदर्भातील ब्रम्हपुरी आणि चंद्रपूर याठिकाणी तापमान उच्चांक गाठत आहे. आज बुधवारी ब्रम्हपुरी शहराने 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले असून, ते देशातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. तर चंद्रपूर 45.5 अंश सेल्सिअससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हवामान खात्याने 24 एप्रिलपर्यंत उष्ण लहरींचा इशारा दिला आहे, त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ब्रम्हपुरी आणि चंद्रपूर शहरात तापमानात सातत्याने वाढ होत असून, उन्हाची तीव्रता नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करत आहे.
रविवारी 44.6 अंश, सोमवारी 45.6 अंश, मंगळवारी 45.8 अंश तापमानाची नोंद झाली होती. आज चंद्रपूरच्या तापमानात 0.3 अंशांनी घट झाली असली तरी ब्रम्हपुरीत 0.4 अंशांनी वाढ होऊन 45.6 अंशाची नोंद झाली आहे.
या वाढत्या तापमानामुळे विदर्भातील जनजीवन विस्कळीत होत असून, चक्कर येणे, उष्माघात यासारख्या घटना वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच अकोला, अमरावती, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर याठिकाणी देखील तापमान 44 अंशांच्या वर नोंदवले गेले आहे. बुलढाणा जिल्ह्यात तुलनेने कमी म्हणजे 40.7 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट दिला असून, नागरिकांनी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेतच बाहेर पडावे, पाणी भरपूर प्यावे आणि थेट उन्हापासून संरक्षण करावे, असे आवाहन केले आहे.