

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : आनंदवनातील तरुणीच्या हत्या प्रकरणातील आरोपी समाधान कोळी याने वरोरा पोलिस ठाण्यात गळपास घेऊन स्वत: चे जीवन संपविले. या प्रकरणी पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तात्काळ कारवाई करीत रविवारी (दि.३०) तीन पोलिसांना निलंबित केले पोलीस हवालदार धनंजय वरगंटीवार, महिला पोलीस हवालदार, मनीषा कुत्तरमारे व पोलीस शिपाई नितीन तुराळे असे निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या कारवाईने पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
वरोरा येथील आनंदवनात आई-वडिलांकडे राहत असलेल्या २४ वर्षीय आरती चंद्रवंशी तरूणीची तेथेच उपचाराकरिता आलेल्या समाधान कोळी नामक युवकाने प्रेम प्रकरणातून अत्याचार करून निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात वरोरा पोलीसांनी आरोपीला अटक केली होती. न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यामुळे आरोपी कोळी हा वरोरा पोलिस ठाण्याच्या कोठडीत होता. पोलिस कस्टडीत असतानाच आरोपी समाधान कोळी याने रविवारी (दि.३०) सकाळी पोलिस कोठडीत शौचालयाच्या दरवाज्याला बुटातील लेसने गळफास घेऊन स्वत:चे जीवन संपविले. त्याने जेव्हा आपली जीवनयात्रा संपविली तेव्हा कोठडीत सेवेवर कुणीच कर्मचारी नव्हते.
सात दिवसांच्या पोलीस कोठडीतील आरोपींवर देखरेख ठेवण्याची जवाबदारी पोलीस हवालदार धनंजय वरगंटीवार, महिला पोलीस हवालदार मनीषा कुत्तरमारे व पोलीस शिपाई नितीन तुराळे यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी सेवेवर असतना आपले कर्तव्य योग्य रीतीने पाळले नाही. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी बुट मधील लेस काढताना दिसतो आहे. या सर्व प्रकरणाची सेवेवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी नोंद घेतली नाही. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून तिघा पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पुढील चौकशी अहवाल येत पर्यंत तिघांचे निलंबन कायम राहील, असे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी माहिती दिली.