

Chandrapur Ambedkarite Community Agitation
चंद्रपूर : ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या संवर्धन आणि विकासासाठी बौद्ध-आंबेडकरी जनतेच्या वतीने चंद्रपुरात भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. दीक्षाभूमीच्या व्यवस्थापनात गेल्या ३६ वर्षांपासून एकाच कुटुंबाची पकड असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच नियमांचे उल्लंघन झाल्याने शासनाकडून मंजूर होणारा विकास निधी परत जाण्याची भीती व्यक्त करत व्यवस्थापनात सर्वसमावेशक बदल करण्याची मागणी करण्यात आली.
मुख्य रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने बौद्ध व आंबेडकरी समाजबांधव मोर्चात सहभागी झाले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
मेमोरियल सोसायटीचे पुनर्गठन करून सर्वसमावेशक समिती स्थापन करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. तसेच ऐतिहासिक बुद्ध विहाराचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचे आधुनिकीकरण करावे, धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा बौद्ध जनतेच्या पुढाकाराने आयोजित करण्यास परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
यासोबतच मागील ३५ वर्षांतील धम्मदानाचा संपूर्ण हिशोब जाहीर करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. दीक्षाभूमीच्या संवर्धन, विकास आणि व्यवस्थापनात पारदर्शकता आणून बौद्ध समाजाचा सहभाग सुनिश्चित करावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.