चंद्रपूर : शेतातील कंपाऊडला लावलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने विद्यार्थ्याचा मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : शेतातील कंपाऊडला लावलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने विद्यार्थ्याचा मृत्यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : शेतातील पिकाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी शेतकऱ्याने कंपाऊडला विद्युत तारा जोडल्या होत्या. या विद्यूत तारेचा शॉक लागून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. चिमूर तालुक्यातील मदनापूर येथे आज (दि.२) सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. विष्णू विनोद कामडी (वय १२)असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिमूर तालुक्यातील मदनापूर येथे रहिवासी असलेला विष्णू विनोद कामडी (वय १२) हा मुलगा जिल्हा परिषद शाळेत पाचवीत शिकतो. तो गावातील मुलांना सोबत घेऊन मॉर्निंगवॉकसाठी जात होता. आज सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळी विद्यालयाच्या खुल्या पंटागणात मुलांसोबत व्यायाम करीत होता. त्यांनतर तो पटागणाला लागून असलेल्या शेतात काही कारणास्तव गेला असता त्याचा वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तसाठी लावलेल्या तारेला स्पर्श झाला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार त्याच्या सोबतच्या मुलांच्या लक्ष्यात येताच त्यांनी गावात जाऊन याची माहिती दिली. याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक दिप्ती मडकाम,पोलीस शिपाई मनोज तुरणकर,वाढई पोलीस शिपाई व विद्युत अभियंता रोकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उतरणीय तपासणीसाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असून या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : 

Back to top button